त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टला ऑक्सिजन प्रकल्पासाठी साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 10:03 PM2021-05-05T22:03:45+5:302021-05-06T01:11:11+5:30
त्र्यंबकेश्वर : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ऑक्सिजनचा तुटवडा भासू नये यासाठी तालुक्याच्या ठिकाणी त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने ऑक्सिजन प्रकल्प ...
त्र्यंबकेश्वर : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ऑक्सिजनचा तुटवडा भासू नये यासाठी तालुक्याच्या ठिकाणी त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने ऑक्सिजन प्रकल्प उभारावा, अशी सूचना प्रांताधिकारी तेजस चव्हाण यांनी त्र्यंबकेश्वर देवस्थानला केली आहे.
तहसीलदार कार्यालयात बुधवारी (दि.५) कोरोना आढावा बैठकीत संभाव्य तिसरी लाट आल्यास त्यावर नियोजन करतांना ऑक्सिजन प्लांट उभारण्याची गरज निर्माण झाली असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तांची बैठक झाली होती. त्यात ४० सिलिंडर्स आरोग्य विभागाला देण्याचा ठराव मंजूर झाला होता. पण यासाठी किटसह ५० ते ६० लक्ष रुपये खर्च अपेक्षित असून तेवढाच खर्च शिवप्रसाद या देवस्थानच्या जागेत ऑक्सिजन प्रकल्प उभारला तर त्यात ऑक्सिजन निर्मिती करणे शक्य होणार आहे. त्यामुळे देवस्थानच्या काही विश्वस्तांनी त्यास होकार दिला असल्याचे समजते. देवस्थानने परवानगी दिल्यास येत्या २५ ते ३० दिवसांत प्रकल्प उभा राहू शकतो. याशिवाय उपजिल्हा रुग्णालयात गरजू रुग्णांच्या उपलब्धतेनुसार रेमडेसिविरचा साठा शासनाकडून मिळू शकेल. जेणेकरून रुग्णांना नाशिकला नेण्याची गरज पडणार नाही. यावेळी चर्चेत प्रांताधिकारी तेजस चव्हाण, तहसीलदार दीपक गिरासे, देवस्थानचे सचिव तथा मुख्याधिकारी संजय जाधव, विश्वस्त संतोष कदम, भूषण अडसरे आदी सहभागी झाले होते.