साकारतोय समग्र सावरकर वाङ्मय कोश
By admin | Published: February 23, 2016 12:07 AM2016-02-23T00:07:29+5:302016-02-23T00:11:37+5:30
प्रकल्पाला वेग : संदर्भासाठी उपयुक्त साहित्यकृती; दोन वर्षांत होणार उपलब्ध
नाशिक : देशवासीयांच्या मनात क्रांतीची ज्योत पेटवणारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या संपूर्ण वाङ्मयाचा समावेश असलेला ‘समग्र सावरकर वाङ्मय कोश’ साकारत असून, अंदाजे तीन ते पाच हजार पृष्ठांचा हा कोश पुढील दोन वर्षांत सावरकरप्रेमींसाठी उपलब्ध होणार आहे.
आगामी सावरकर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष चंद्रकांत शहासने, निमंत्रक भाऊ सुरडकर व कोशाचे संपादक डॉ. नागेश कांबळे यांनी याविषयी माहिती दिली. ग्रंथालय व माहितीशास्त्राचे अभ्यासक डॉ. कांबळे यांना गेल्या वर्षी या कोशाची कल्पना सुचली. त्यांनी बदलापूर येथील स्वायत्त मराठी विद्यापीठाच्या कार्यकारी मंडळासमोर यासंदर्भात प्रस्ताव ठेवताच त्याला मंजुरी मिळाली. तेव्हापासून या कोशाचे काम सुरू आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित समग्र ग्रंथ, सावरकर साहित्यविषयक इतर लेखकांचे ग्रंथ, विविध नियतकालिकांनी प्रकाशित केलेल्या प्रासंगिक विशेषांकांचा, त्यातील लेखांचा तपशील, स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलनांप्रसंगी प्रकाशित झालेल्या विविध संस्थांच्या स्मरणिकांचा व त्यातील लेखांचा तपशील, सावरकरांच्या विविध पैलूंशी निगडित नियतकालिकांतील तसेच वृत्तपत्रांतील लेखांचा तपशील, सावरकरांच्या जीवनाशी, साहित्याशी निगडित ध्वनिफिती, चित्रफिती (सीडी/डीव्हीडी) अन्य पैलू अशा सहा भागांचा या कोशात समावेश राहणार आहे. या सर्व विभागांतील साहित्य संकलनाचे काम सुरू असून, आतापर्यंत जवळपास एक हजार पृष्ठे हस्तलिखित मजकूर तयार झाला आहे.
कोशातील सर्व साहित्य मूळ मजकुराबरहुकूम, कोणतेही संपादकीय संस्कार न करता पुनर्मुद्रित केले जाणार आहे. सावरकर साहित्यावर संशोधन करू इच्छिणाऱ्या अभ्यासकांना हा कोश महत्त्वपूर्ण संदर्भसाधन उपलब्ध करून देणार असल्याचे डॉ. कांबळे यांनी यावेळी सांगितले. (प्रतिनिधी)