भाईगिरीसाठी केला गोळीबाराचा बनाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 12:53 AM2018-07-29T00:53:18+5:302018-07-29T00:53:33+5:30
एकलहरे येथे दोन दिवसांपूर्वी रात्री युवकावर झालेल्या गोळीबार प्रकरणी त्या जखमी युवकाने दोघा मित्रांच्या मदतीने भाईगिरी करून प्रसिद्धी मिळविण्यासाठी गोळीबाराचा बनाव घडवून आणल्याची धक्कादायक बाब पोलीस तपासात निष्पन्न झाली आहे.
नाशिकरोड : एकलहरे येथे दोन दिवसांपूर्वी रात्री युवकावर झालेल्या गोळीबार प्रकरणी त्या जखमी युवकाने दोघा मित्रांच्या मदतीने भाईगिरी करून प्रसिद्धी मिळविण्यासाठी गोळीबाराचा बनाव घडवून आणल्याची धक्कादायक बाब पोलीस तपासात निष्पन्न झाली आहे. या प्रकरणी जखमी युवकांसह त्याचा एक मित्र व अल्पवयीन मुलगा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून गावठी कट्टा जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांनी पत्रकार परिषदेत दिली. एकलहरे चेमरी नंबर १ ऐश्वर्या रो-हाउस येथे राहणारा मुकेश रावसाहेब सपकाळ (२२) मूळ रा. कोपरगाव हा मनपा नगरसेवक विशाल संगमनेरे यांच्या कार्यालयात कामाला आहे. मुकेश बुधवारी (२५ जुलै) रात्री ११ वाजता एकलहरे कॉलनीत वाघमारे यांच्याकडे मोबाइल रिचार्ज करण्यासाठी गेला होता. मोटारसायकल लावत असताना अज्ञात व्यक्तीने केलेल्या गोळीबारात मुकेश याच्या कमरेजवळ गोळी लागल्याने तो जखमी झाला होता. गोळीबाराच्या घटनेनंतर दोघे युवक अंधारातून मोटारसायकलवर पळून गेले अशी फिर्याद देण्यात आल्याने नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. सहायक पोलीस आयुक्त मोहन ठाकूर व नाशिकरोडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक जयदीप गोसावी, हवालदार विलास उजागरे, संतोष घुगे, भालेराव, नीलेश विखे, विशाल कुंवर, अविनाश जुंद्रे या गोळीबार घटनेचा तपास करत असताना जखमी मुकेश सपकाळ याची चौकशी केली असता कोपरगाव येथील एका खुनाच्या गुन्ह्यातील संशयितांना पोलिसांना आपली नावे मुकेश याने सांगितल्याचा संशय आहे. त्यामुळे खुनाच्या गुन्ह्यातील संशयितांनी गोळीबार केल्याचा संशय जखमी मुकेश याने व्यक्त केला. गुरुवारी पोलीस पथकाने कोपरगाव येथे जाऊन संशयितांची माहिती घेऊन कसून चौकशी केली. तर त्यातील एक संशयित मोका कायद्यान्वये कारागृहात असल्याचे उघडकीस आले. त्यामुळे पोलिसांचा जखमी मुकेशवरच संशय बळावला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे व सहकाऱ्यांनी जखमी मुकेश यांचा मोबाइल व सीसीटीव्ही कॅमेºयाचे फुटेज तपासून जखमी मुकेश याचीच कसून चौकशी केली असता भाईगिरी करण्यासाठी प्रसिद्धी मिळविण्यासाठी व कोपरगाव खुनाच्या गुन्ह्यातील संशयित आरोपीपासून बचाव करण्यासाठी एकलहरे येथील अल्पवयीन मित्र व संशयित संदेश ऊर्फ सॅन्डी आनंदा भालेराव (वय २०), रा. पहाडीबाबा झोपडपट्टी, सिद्धार्थनगर, एकलहरा यांच्या मदतीने गोळीबाराचा बनाव रचल्याचे तपासात निष्पन्न झाले. यामध्ये संशयित अल्पवयीन मुलाने गावठी कट्ट्यातून गोळीबार करून संदेश भालेराव यांच्या गाडीवरून पळून गेले.
पोलिसांनी संशयित अल्पवयीन मुलाच्या घरून गावठी कट्टा जप्त केल्याची माहिती उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिली.