‘सखाराम बाइंडर’ला आठ पारितोषिके
By admin | Published: January 30, 2015 12:34 AM2015-01-30T00:34:10+5:302015-01-30T00:34:31+5:30
कामगार कल्याण नाट्य स्पर्धा : नाशिकचे ‘वा गुरू’ द्वितीय, तर जळगावच्या ‘विठ्ठला’ला तृतीय पारितोषिक
सातपूर : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने झालेल्या ६२ व्या नाट्य स्पर्धेत देवळाली गाव कामगार केंद्राच्या ‘सखाराम बाइंडर’ या नाटकाने अक्षरश: धूम केली. उत्कृष्ट नाटकासाठीच्या प्रथम पारितोषिकासह ‘सखाराम’ने तब्बल आठ पारितोषिके खिशात टाकली. नाशिकच्या बुधवार पेठ केंद्राच्या ‘वा गुरू’ने द्वितीय, तर जळगावच्या पिंप्राळा केंद्राच्या ‘विठ्ठला’ नाटकाने तृतीय पारितोषिक पटकावले. पहिल्या दोन्ही नाटकांची अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे.
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ नाशिक विभागाच्या वतीने महाकवी कालिदास कलामंदिरात २ ते २८ जानेवारीदरम्यान सदर स्पर्धेची प्राथमिक फेरी पार पडली. स्पर्धेत एकूण अठरा संघांनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण गुरुवारी येथील कामगार कल्याण भवनात झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ अभिनेते विजय साळवे होते. प्रमुख पाहुणे म्हणून फरिदा शेख, परीक्षक रवींद्र ढवळे, शुभांगी पाठक, अरुण भावसार, सहायक कल्याण आयुक्त संजय धुमाळ, कामगार कल्याण अधिकारी भावना बच्छाव आदि उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विजेत्या संघांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.
यावेळी साळवे म्हणाले, नाटक ही एक कला असून, ती आत्मसात करण्यासाठी तिच्या प्रेमात पडायला हवे. या कलेत जीव ओतल्यास नाटकाचा दर्जा उंचावतो. नाटक सादर करताना इतरांऐवजी स्वत:शीच स्पर्धा करावी. नाटक समाजाला जागृत करते आणि माणसाला आणखी माणूसपणाच्या जवळ नेते. परीक्षकांच्या वतीने ढवळे यांनी मनोगत व्यक्त केले. महेश विभांडिक यांनी सूत्रसंचालन केले. भानुदास जाधव यांनी आभार मानले.