सैलानी पुरस्काराने माजी सैनिकांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 01:20 AM2019-04-01T01:20:42+5:302019-04-01T01:20:56+5:30
जेलरोड येथील सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान असलेले हजरत सय्यद सैलानी बाबा यांच्या वार्षिक संदलोत्सवानिमित्त दर्गाच्या विश्वस्त मंडळाकडून शहर व परिसरातील माजी सैनिकांना ‘सैलानी पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
नाशिक : जेलरोड येथील सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान असलेले हजरत सय्यद सैलानी बाबा यांच्या वार्षिक संदलोत्सवानिमित्त दर्गाच्या विश्वस्त मंडळाकडून शहर व परिसरातील माजी सैनिकांना ‘सैलानी पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
सैलानी बाबा दर्गा जेलरोडसह शहर व परिसरातील सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान असलेले सुफी संत सैलानी बाबा यांचा संदल (यात्रोत्सव) विविध धार्मिक, सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. सायंकाळी पारंपरिक पद्धतीने विधिवत सैलानी बाबा यांच्या मजार शरीफवर फुलांची चादर अर्पण करण्यात आली. तत्पूर्वी परिसरातून ढोल-ताशाच्या गजरात चादरची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी सैलानी पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
यंदाचे पुरस्कार वितरणाचे दुसरे वर्षे होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर, सूर्यवंशी, आदी पोलीस अधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन माजी सैनिक तथा कारगिल युद्धात योगदान देणारे आत्माराव वाघ, एस. एल. राठोड, व्ही. एस. भदाणे, वाघ आदींना गौरविण्यात आले. दरम्यान, उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी डॉ. मिलिंद पवार, दर्गाचे सेवेकरी दिनेश पाटील, संदीप खरोटे, भारत भोई, मुन्ना शेख, अश्पाक कुरेशी, गौरव भालेराव आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रसाद जामखिंडीकर यांनी केले. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते़