मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतरांचे पगार विनाअडथळा बँकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 07:26 PM2021-02-08T19:26:17+5:302021-02-09T00:46:43+5:30
सिन्नर : नाशिक वेतन पथक व भविष्य निर्वाह निधी कार्यालय, नाशिकचे अधीक्षक उदय देवरे यांनी जिल्ह्यातील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे जानेवारी २०२१चे वेतन बँकेत थेट कर्मचाऱ्यांच्या खात्यावर वर्ग करुन सुखद धक्का दिला आहे.
याबाबत मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एस. के. सावंत, कार्याध्यक्ष एस. बी. शिरसाट यांनी माहिती दिली. शिक्षक, शिक्षकेतरांचे वेळेवर वेतन होण्यासाठी सतत प्रयत्न सुरु होते तरीसुद्धा मुख्याध्यापकांच्या खात्यावर वेतन आल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या खात्यावर वर्ग होण्यासाठी मुख्याध्यापकांकडून आॅनलाईन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरदेखील उशीर होत होता. बँकेकडून कर्मचाऱ्यांच्या खात्यावर वेतन वर्ग व्हायला किमान एक आठवडा लागत असे. त्यामुळे वेतनपथक कार्यालयाकडून वेळेवर कामकाज होऊनही कर्मचाऱ्यांना वेतन मिळण्यासाठी विनाकारण प्रतीक्षा करावी लागत होती. यावेळी जिल्हा मुख्याध्यापक संघाचे मार्गदर्शक सुरेश शेलार, गुफरान अन्सारी, उपाध्यक्ष प्रदीप सांगळे, माणिक मढवई, पुरुषोत्तम रकिबे, राजेंद्र सावंत, संगीता बाफना, परवेजा शेख, अशोक कदम, बी. डी. गांगुर्डे, एम. व्ही. बच्छाव, दीपक व्याळीज, डी. एस. ठाकरे, एस. ए. पाटील, योगेश पाटील आदी उपस्थित होते.
राज्यात नाशिक जिल्हा पहिला
शाळा सुरु झाल्यानंतर थेट कर्मचाऱ्यांच्या खात्यात वेतन वर्ग करणारा महाराष्ट्रातील नाशिक हा पहिला जिल्हा ठरला आहे. याचे श्रेय नाशिक वेतन पथक कार्यालयाचे अधीक्षक उदय देवरे व त्यांच्या सहकाऱ्यांना जात असल्याचे मुख्याध्यापक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. त्यांना मदत करणारे कर्मचारी तुकाराम घुले आणि संदीप औटे यांचाही त्यात मोलाचा वाटा असल्याचे ते म्हणाले.