कधी व्हायचं शुभमंगल सावधान? तिशी ओलांडली; पगार कमी, शेतकऱ्याला नवरी मिळेना!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2022 04:24 PM2022-03-17T16:24:04+5:302022-03-17T16:28:26+5:30
नाशिक - समाजात मुलांच्या तुलनेत मुलींचे कमी प्रमाण, शिक्षणातील तफावत, नोकरी, उत्पन्नाविषयी असलेल्या वाढत्या अपेक्षा यांसह विविध कारणांमुळे तिशी-पस्तीशी उलटूनही ...
नाशिक - समाजात मुलांच्या तुलनेत मुलींचे कमी प्रमाण, शिक्षणातील तफावत, नोकरी, उत्पन्नाविषयी असलेल्या वाढत्या अपेक्षा यांसह विविध कारणांमुळे तिशी-पस्तीशी उलटूनही अनेक तरुणांचे विवाह जुळून येण्यास अडचणी येत आहेत. त्यातच कमी पगार आणि शेतकरी मुलाला विवाहासाठी मुलगी मिळणे कठीण झाले आहे. मोठ्या पगाराची नोकरी, शहरात स्वत:चे घर आणि वास्तव्यास असेल तरच स्थळ सूचवा, अशी पूर्व अट बहुतांश मुली आणि त्यांच्या पालकांकडून टाकली जात आहे.
मुले आणि मुलीचे लिंग गुणोत्तर अजूनही समान प्रमाणात नाही. आजही अनेकांना मुलगी ओझे वाटत असल्याने स्त्रीभ्रूण हत्येचे प्रकार घडतात. मात्र, गत दहा-पंधरा वर्षांत त्याचे दुष्परिणाम समोर येऊ लागले आहेत. शहरासह ग्रामीण भागात पस्तीशी उलटूनही ‘नवरी मिळे नवऱ्याला’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. उच्चशिक्षित, चांगली नोकरी आणि उत्तम कमाई असेल तर अशा मुलांचा विवाह लवकर जुळून येतो. मात्र, शेती, व्यवसाय आणि कमी पगाराची नोकरी करणाऱ्या मुलांचे विवाह रखडत आहे. त्यामुळे विवाह नोंदणी संस्थांमध्ये नोंदणीचे प्रमाण वाढत आहे.
म्हणून वाढतेय विवाहाचे वय
इंजिनिअरिंग, मेडिकल, सीए, वकील, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या मुलांचे शिक्षण पूर्ण करण्यात किमान पंचवीस ते सत्तावीस वर्षं वय निघून जाते. त्यानंतर नोकरी शोधणे आणि स्थिरस्थावर होण्यात दोन-चार वर्षांचा कालावधी जातो. त्यानंतर विवाहाचा विचार केला जातो. तोपर्यंत किमान तिशी ओलांडून जाते.
वकिलाला वकील, डॉक्टरला हवा डॉक्टर
आयुष्याचा जोडीदार निवडता त्याचे शिक्षण आपल्या बरोबरीचे किंवा क्षेत्राशी निगडित असावे, असे प्रत्येकालाच वाटते. त्यामुळे वकिलाकडून वकील, इंजिनिअरकडून इंजिनिअर, डॉक्टरकडून डॉक्टरला याप्रमाणे पेशानुसार जोडीदार निवडण्यास प्राधान्य दिले जाते.