सहा महिन्यांपासून रखडले प्राध्यापकांचे वेतन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:10 AM2021-07-12T04:10:40+5:302021-07-12T04:10:40+5:30

नाशिक : राज्यातील विनाअनुदानित अभियांत्रिकी, फार्मसी महाविद्यालयांसह अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांच्या माध्यमातून दरवर्षी जवळपास साडेतीन ते चार लाख ...

Salary of professors stagnant for six months | सहा महिन्यांपासून रखडले प्राध्यापकांचे वेतन

सहा महिन्यांपासून रखडले प्राध्यापकांचे वेतन

Next

नाशिक : राज्यातील विनाअनुदानित अभियांत्रिकी, फार्मसी महाविद्यालयांसह अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांच्या माध्यमातून दरवर्षी जवळपास साडेतीन ते चार लाख विद्यार्थी समाजकल्याण आयुक्‍तालयाकडे शिष्यवृत्तीसाठी अर्ज करतात. मागील वर्षापासून महाविद्यालयांना शिष्यवृत्तीपोटी शैक्षणिक शुल्काच्या प्रतिपूर्तीच्या स्वरूपात मिळणारेे जवळपास चारशे कोटी रुपये मिळणे अपेक्षित आहेत; परंतु ही रक्कम अद्याप महाविद्यालयांना मिळू शकलेली नाही, त्यामुळे हजारो प्राध्यापकांचे गेल्या सहा महिन्यांपासून वेतन मिळू शकलेले नाही. अशा प्राध्यापकांसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसमोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे.

विनाअनुदानित अभियांत्रिकी व फार्मसी महाविद्यालयांसह विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांना विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काचा मोठा भाग हा समाजकल्याण विभागाच्या शिष्यवृृत्तीच्या माध्यमातून मिळत असतो. नाशिकमध्ये हे प्रमाण सुमारे ८० ते ८५ टक्के आहे; परंतु महाविद्यालयांना मागील वर्षाची आणि चालू वर्षातीलही शिष्यवृत्तीची प्रतिपूर्ती मिळू शकलेली नाही. त्यामुळे संबंधित महाविद्यालयांमधील प्राध्यापक, प्रयोगशाळा सहायक, शिपाई यांचे वेतन मागील सहा ते सात महिन्यांपासून रखडले आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांसमोर गृहकर्ज परतफेडीचे हप्ते, वाहनकर्ज व अन्य खर्च भागविण्याचे आव्हान निर्माण झाले असून, काही शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर मालमत्तेतील काही भाग विकून खर्च भागविण्याची वेळ आली आहे. नाशिक जिल्ह्यात अभियांत्रिकीचे १९, तर अभियांत्रिकी पदविकेची २५, पदव्युत्तर पदवीची ९ महाविद्यालये आहेत, तर बी फार्मसीची २५, फार्मा डी २, डी फार्मसी ३१, एम फार्मची १० महाविद्यालये आहेत. यासोबतच एमबीए, एमसीए, हॉटेल मॅनेजमेंट, आर्किटेक्चरसारख्या महाविद्यालयांमध्येही हीच स्थिती आहे. मात्र, नियमित वेतन नसल्याने आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असतानाही कोणीही कर्मचारी नोकरीवर संकट निर्माण होण्याच्या भीतीने आवाज उठविण्यास तयार होत नसल्याचे दिसून येत आहे.

इन्फो-

अभियांत्रिकी अथवा तंत्रनिकेतनच्या प्राध्यापकांची एकजूट असलेली संघटना कार्यरत नाही. अशाप्रकारे संस्थांतर्गत संघटना असलेल्या तरी या संघटनांवरही संस्थाचालकांचेच वर्चस्व आहे, त्यामुळे अशा संस्थांचे पदाधिकारी प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी संस्थाचालकांसमोर प्रश्न मांडत नसल्याची व्यथा एका प्राध्यापकाने व्यक्त केली.

इन्फो-

प्रवेश घटल्याने नोकरी संकटात

वाढती बेरोजगारी आणि शिक्षणाचा वाढता खर्च यामुळे अभियांत्रिकी अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत आहे. नाशिक जिल्ह्यात २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात १९ अभियांत्रिकी पदवीसाठी केवळ ४३ टक्के, तर डिप्लोमासाठी ५६ टक्के प्रवेश निश्चित होऊ शकले होते. त्यामुळे रिक्त राहणाऱ्या जागांच्या विद्या शाखांची मान्यता रद्द होण्याची किंवा महाविद्यालयांकडून या शाखा बंद करण्याची शक्यता असल्याने अशा शाखांच्या प्राध्यापकांची नोकरीही संकटात आली आहे.

इन्फो-

गतवर्षात व्यावसायिक अभ्यासक्रमांची स्थिती

शाखा - महाविद्यालये- उपलब्ध जागा- प्रवेश

बी. ई. / बी. टेक - १९ - ७५३० -३२३९

एम.ई -०९ -५६४ - १८८

डिप्लोमा - २५ - ९२५४ -५१७८

बी. फार्मसी - २५ - २०३७ - १८७२

एम.फार्मसी - १० -७७० - ७४७

डी. फार्मसी -३१ - १९५३ -१९३६

Web Title: Salary of professors stagnant for six months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.