मुंबईकरांना १५० टन भाजीपाला, फळांची विक्र ी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2020 11:42 PM2020-04-26T23:42:07+5:302020-04-26T23:42:18+5:30
कोरोनामुळे गेला एक महिना सुरू असलेल्या लॉकडाउनमध्ये मुंबईकरांना दिलासा देण्याचे काम सिन्नर तालुक्यातील भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांनी केले आहे. शासनाच्या कृषी विभागाने आत्मा अंतर्गत स्थापन केलेल्या शेतकरी बचतगटांच्या माध्यमातून मुंबईत विविध भागात सुमारे १५० टन ताजा भाजीपाला आणि फळे पाठविण्यात आली आहेत.
सिन्नर : कोरोनामुळे गेला एक महिना सुरू असलेल्या लॉकडाउनमध्ये मुंबईकरांना दिलासा देण्याचे काम सिन्नर तालुक्यातील भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांनी केले आहे. शासनाच्या कृषी विभागाने आत्मा अंतर्गत स्थापन केलेल्या शेतकरी बचतगटांच्या माध्यमातून मुंबईत विविध भागात सुमारे १५० टन ताजा भाजीपाला आणि फळे पाठविण्यात आली आहेत. उत्पादक ते ग्राहक या संकल्पनेतून या उत्पादनांची रास्त दरात विक्र ी करण्यात येत आहे.
कोरोनामुळे देशात आपत्ती जाहीर करण्यात आली असून, लॉकडाउनमुळे वाहतूक आणि दळणवळण ठप्प झाले आहे. सर्वच ठिकाणी त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या तुटवडा जाणवत असून अनेकांनी या संधीचा फायदा घेत उखळ पांढरे करायला सुरुवात केली आहे. सरकारने जीवनावश्यक वस्तू आणि भाजीपाला, दूध वाहतूक आणि विक्री करायला परवानगी दिली असली तरी मागणीच्या प्रमाणात पुरवठा होणे अशक्य आहे. अशा परिस्थितीत देशाची आर्थिक राजधानी असणाºया मुंबापुरीत सर्वसामान्यांची अडवणूक होऊ नये यासाठी तालुक्यातील वडगाव, सिन्नर, जोगलटेंभी व दोडी येथील शेतकरी बचतगटांनी पुढाकार घेतला आहे. कृषी विभागाच्या कृषी तंत्रज्ञान व व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत हे शेतकरी गट स्थापन करण्यात आले असून, उत्पादक ते थेट ग्राहक या संकल्पनेतून मुंबईसाठी १५० टन भाजीपाला पुरविण्यात आला आहे.
वडगाव सिन्नरच्या वसुंधरा सेंद्रिय शेतमाल उत्पादक शेतकरी गटामार्फत आठवड्यातून तीन वेळा लक्ष्मीनगर (गोरेगाव), नर्सीपार्क(जुहू), शारण ग्रुप (वर्सोवा) येथे उमेशा ठक्कर यांच्या मदतीने भाजीपाला विक्री केंद्र सुरू करण्यात आले आहे. तर जोगलटेंभी येथील बळीराजा शेतकरी बचतगटाने नंदिनी छाब्रिया व मुकुंद मेहरा यांच्या साहाय्याने ब्रीचकॅण्डी परिसरातील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या परिसरात व दोडी येथील शेतमाल फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीने विविध सोसायट्यांमध्ये भाजीपाला उपलब्ध करून दिला आहे.
आत्मा अंतर्गत स्थापन केलेल्या शेतकरी गटांना मुंबईत भाजीपाला विक्र ीला पाठविण्यासाठी तालुका कृषी अधिकारी अण्णासाहेब गागरे यांनी पुढाकार घेतला. नाशिकचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा आत्माचे प्रकल्प संचालक संजय पडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्प उपसंचालक कैलास शिरसाट, हेमंत काळे यांनी वाहतूक परवान्यासह भाजीपाला विक्र ीसाठी शासनाकडून आवश्यक परवानग्या मिळवून दिल्या आहेत.