कारागृहातील सर्व गणेशमूर्तींची विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 10:13 PM2017-08-20T22:13:48+5:302017-08-21T00:24:58+5:30
नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात बंदीबांधवांनी बनविलेल्या शाडूमातीच्या पर्यावरणपूरक १५० गणेशमूर्ती हातोहात विकल्या गेल्या आहेत. बाजारभावापेक्षा कमी भावात व पर्यावरणपूरक शाडूमातीच्या गणरायाच्या मूर्तींना भाविकांनी प्राधान्य दिले आहे.
नाशिकरोड : नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात बंदीबांधवांनी बनविलेल्या शाडूमातीच्या पर्यावरणपूरक १५० गणेशमूर्ती हातोहात विकल्या गेल्या आहेत. बाजारभावापेक्षा कमी भावात व पर्यावरणपूरक शाडूमातीच्या गणरायाच्या मूर्तींना भाविकांनी प्राधान्य दिले आहे. नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात एका गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेला बंदी सागर भरत पवार हा पेण येथील असून, तो चांगला मूर्तिकार आहे. बंदी सागर याने कारागृह प्रशासनाकडे श्री गणरायाच्या मूर्ती बनविण्यासाठी परवानगी देण्याची गेल्या चार वर्षांपूर्वीच मागणी केली होती. मात्र सागर याच्या मागणीकडे कारागृह प्रशासनाने गांभीर्याने लक्ष दिले नाही. सध्याचे कारागृह अधीक्षक राजकुमार साळी यांनी सागर पवार याची मागणी लक्षात घेऊन वरिष्ठांकडून परवानगी मिळवत मूर्ती बनविण्यासाठी कच्चा माल उपलब्ध करून दिला होता. दीड-दोन महिन्यांपूर्वी बंदी सागर याला श्री गणपतीच्या मूर्ती बनविण्याची परवानगी व कच्चा माल मिळाल्यानंतर त्याने सहकारी बंदी चंद्रकांत सागवेकर, सखाराम बोले, विलास दिवे, अशोक भरत, गणेश सोनवणे यांना मार्गदर्शन करून विविध आकारांच्या, प्रकारच्या ‘श्रीं’च्या मूर्तींचे साचे बनविले. एक-दीड महिन्याच्या कालावधीत सागर व त्यांच्या सहकाºयांनी शाडूमातीच्या पर्यावरणपूरक वेगवेगळ्या आकाराच्या सुमारे १५० रेखीव श्री गणरायाच्या मूर्ती बनविल्या. आकर्षक रंगरंगोटी व रेखीव मूर्तींना रंगीबेरंगी खड्यांचे हार, कानातले आदी प्रकारे सजावट करण्यात आली आहे. पहिल्यांदाच कारागृहात कैद्यांनी बनविलेल्या मूर्ती प्रवेशद्वाराजवळील प्रगती भांडारमध्ये चार दिवसांपूर्वी विक्रीस ठेवल्या होत्या. पर्यावरणपूरक शाडूमातीच्या, रेखीव व बाजारभावापेक्षा कमी दरात असलेल्या मूर्ती भाविकांनी हातोहात खरेदी करून लागलीच घरी घेऊन गेले. ‘श्रीं’च्या आगमनाला अद्याप ४ दिवसांचा अवधी शिल्लक असताना कारागृहात बंदीबांधवांनी बनविलेल्या मूर्ती हातोहात विक्री झाल्या आहेत. काही मूर्ती कारागृहाचे कर्मचाºयांनी देखील विकत घेतल्या आहेत.
कारागृहात बनविलेल्या विविध आकारांच्या श्री गणरायाच्या मूर्तीसोबत त्या आकाराचा सागवानी लाकडी पाटसुद्धा देत आहोत. पहिल्या टप्प्यातील मूर्प्ती संपल्या असून, राहिलेल्या मूर्ती लवकरच उपलब्ध करून देणार आहोत. भाविकांनी दिलेल्या प्रतिसादामुळे पुढील वेळेला लवकर नियोजन केले जाईल.
- पल्लवी कदम, कारागृह कारखाना प्रमुख