पंचवटीत सर्रासपणे गुटख्याची विक्री सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 11:04 PM2018-07-31T23:04:43+5:302018-08-01T00:14:09+5:30
गुटख्याचे शरीरावर होणारे घातक परिणाम तसेच युवकांमध्ये गुटखा सेवन करण्याचे वाढलेले प्रमाण लक्षात घेऊन शासनाने गुटखाबंदीचे आदेश काढले खरे; मात्र गुटखाबंदी असतानाही पंचवटी विभागात सर्रासपणे गुटख्याची विक्री सुरू असल्याचे दिसून येत आहे.
पंचवटी : गुटख्याचे शरीरावर होणारे घातक परिणाम तसेच युवकांमध्ये गुटखा सेवन करण्याचे वाढलेले प्रमाण लक्षात घेऊन शासनाने गुटखाबंदीचे आदेश काढले खरे; मात्र गुटखाबंदी असतानाही पंचवटी विभागात सर्रासपणे गुटख्याची विक्री सुरू असल्याचे दिसून येत आहे. पंचवटी विभागातील पानटपरी, चहाटपरी ते किराणा दुकान एवढेच नव्हे तर हॉटेलांमध्येही गुटख्याची सर्रासपणे विक्री केली जाते. दुसरीकडे पान दुकानदार तसेच अन्य दुकानात गुटख्याची विक्री केली जाते. नाशिक शहरात गुजरात राज्यातून मोठ्या प्रमाणात गुटख्याची तस्करी केली जात आहे. अनेकदा याबाबत पोलिसांनाही माहिती मिळते; मात्र त्यांच्याकडूनही कारवाई होत नसल्याचे बोलले जाते. पंचवटी विभागात गेल्या आठवड्यात गुन्हे शाखेच्या पथकाकडून गुटखा जप्तीची कारवाई केली गेली व या कारवाईत सुमारे दहा ते बारा लाख रुपयांचा गुटखा पकडला गेला; परंतु याबाबत पोलीस प्रशासनाकडून कोणतीही स्पष्टोक्ती न केल्याने गुटखा नेमका पकडला कोणी व कारवाई केली कोणी हे गुलदस्त्यातच आहे.