संरक्षित प्राण्यांच्या यादीमध्ये समाविष्ट असलेल्या मांडूळसह घारीची विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2018 12:45 AM2018-08-15T00:45:12+5:302018-08-15T00:47:47+5:30
संरक्षित प्राण्यांच्या यादीमध्ये समाविष्ट असलेल्या दुर्मीळ सर्पाच्या प्रजातीपैकी एक मांडूळ जातीच्या सर्पासह घारीची तीस लाखांत रुपयांमध्ये विक्री करण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयिताच्या वनविभाग व पोलिसांनी मुसक्या आवळल्या. नाशिकरोड परिसरातील मोरे मळ्यात गुन्हे शाखेच्या युनिट-२च्या पथकाने वनविभागाच्या कर्मचाºयांसह छापा मारला.
नाशिक : संरक्षित प्राण्यांच्या यादीमध्ये समाविष्ट असलेल्या दुर्मीळ सर्पाच्या प्रजातीपैकी एक मांडूळ जातीच्या सर्पासह घारीची तीस लाखांत रुपयांमध्ये विक्री करण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयिताच्या वनविभाग व पोलिसांनी मुसक्या आवळल्या. नाशिकरोड परिसरातील मोरे मळ्यात गुन्हे शाखेच्या युनिट-२च्या पथकाने वनविभागाच्या कर्मचाºयांसह छापा मारला. याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी, संरक्षित प्राण्यांची होणारी तस्करी रोखण्यासाठी पोलीस आयुक्तांनी गुन्हे शाखेला सतर्कतेच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांच्या नेतृत्वाखाली मोरे मळ्यात संशयित ज्ञानेश्वर ऊर्फ दिनेश सोनाजी चव्हाण (३६, रा. गुंबाडे चाळ, खोली क्र. १) याच्या घरी छापा टाकला. यावेळी वनपरिमंडळ अधिकारी (पश्चिम) रवींद्र सोनार, वनरक्षक विजयसिंग पाटील, उत्तम पाटील हेदेखील कारवाईत सहभागी होते. पोलिसांनी चव्हाण यास ताब्यात घेतल्यानंतर राहत्या घरात एका मातीच्या मडक्यात मांडूळ दडवून ठेवल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. त्यानुसार पोलिसांनी मडके तपासले असता त्यामध्ये सुमारे ११५ सें.मी लांबीचा तपकिरी रंगाचा मांडूळ जातीचा सर्प व घार आढळून आली.
सर्प व घारीला वनविभागाच्या अधिकाºयांना सोपविण्यात आले आहे. याबाबत पोलिसांनी चव्हाण यास अटक केली असून, त्याच्यावर वन्यप्राणी संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चव्हाण यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
न्यायालयाच्या आदेशानंतर मुक्तता
नाशिकरोड येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी वनविभागाला पुणे येथील झुलॉजिकल सर्व्हे आॅफ इंडियाकडून वन्यप्राणी मांडूळ व घारीची ओळख पटविण्याचे आदेश दिले आहे. यानुसार या संस्थेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर तो न्यायालयात सादर केला जाणार आहे. त्यानंतर न्यायालयीन आदेशाने मांडूळ व घारीला नैसर्गिक अधिवासात मुक्त केले जाणार असल्याचे वनपरिमंडळ अधिकारी रवींद्र सोनार यांनी सांगितले.
सातशे ग्रॅम वजन
मांडूळ जातीच्या सर्पाविषयी समाजात अंधश्रद्धा आहे. तसेच निसर्गातील विविध पक्ष्यांच्या बाबतीमध्येही अशाच अंधश्रद्धेपोटी विविध समज-गैरसमज पसरलेले आहेत. त्यामुळे मांडूळसारख्या सर्पाला मोठी किंमत बाजारात मिळते. मांडुळाची लांबी, वजनावरून त्याची किंमत ठरविली जाते. हजारो ते लाखोंच्या घरामध्ये किंमत मिळत असल्याने मांडूळची तस्करी केली जाते. छापा टाकून जप्त करण्यात आलेल्या मांडूळचे वजन अंदाजे सातशे ग्रॅम इतके होते.