ट्रकमधून २८ लाखांच्या विदेशी मद्याची विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 11:04 PM2017-08-01T23:04:23+5:302017-08-01T23:04:29+5:30
नांदेड शहरामध्ये ट्रकमधून विदेशी मद्याचा ५० लाख रुपये किमतीचा साठा पोहोचविण्यासाठी निघालेल्या ट्रकमधून संशयित दोघांनी नाशिकरोड परिसरातील एका व्यापाºयाला यापैकी २८ लाख रुपयांच्या मद्याचा माल विक्री केल्याची घटना उघडकीस आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : नांदेड शहरामध्ये ट्रकमधून विदेशी मद्याचा ५० लाख रुपये किमतीचा साठा पोहोचविण्यासाठी निघालेल्या ट्रकमधून संशयित दोघांनी नाशिकरोड परिसरातील एका व्यापाºयाला यापैकी २८ लाख रुपयांच्या मद्याचा माल विक्री केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी आडगाव पोलिसांनी औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूरमधून दोघा संशयितांच्या मुसक्या आवळल्या आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, विजय रामचंद्र कोठवले (रा.श्रीरामनगर, आडगाव) यांनी त्यांच्या मालकीचा ट्रक (एमएच १५ एएम २०२८) तात्पुरत्या स्वरूपात मालकी हक्क संशयित पोपट नाना बागुल, संदीप कारभारी गायकवाड (दोघे रा.वैजापूर) यांच्याकडे दिला. सदर ट्रकमधून ५० लाख रुपयांचा विदेशी मद्यसाठा नांदेड येथे निश्चित स्थळी पोहचविण्यास सांगितले; मात्र या साठ्यापैकी सुमारे २८ लाख ४२ हजार रुपये किमतीचे मद्य संशयित बागुल व गायकवाड यांनी संगनमत करत नाशिकरोडमध्ये विक्री केल्याची माहिती कोठवले यांना समजली. त्यांनी संशयितांकडे विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे कोठवले यांनी आडगाव पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार कथन करत फिर्याद दिली. पोलिसांनी तातडीने तपासचक्रे फिरवून तत्काळ पथक वैजापूरच्या दिशेने रवाना केले. पोलिसांनी वैजापूरमधून संशयित बागुल व गायकवाड या दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी अधिक तपास आडगाव पोलीस करत आहेत.