चोरीच्या दुचाकींवरील इंजिनचा नंबर बदलून विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 12:26 AM2018-04-03T00:26:53+5:302018-04-03T00:26:53+5:30
गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी आलेल्या दुचाकींचे आरसी बुक चोरून त्यानुसार चोरीच्या दुचाकींवर इंजिन नंबर तसेच नंबरप्लेट बदलून त्यांची विक्री करणाऱ्या गॅरेजचालकास मध्यवर्ती गुन्हे शाखा युनिटने अटक केली आहे़ सनी मुरलीधर तांबेरे (२० रा. ध्रुवनगर, कॅनॉलरोड) असे या संशयित गॅरेजमालकाचे नाव असून, त्याच्याकडून सव्वा लाख रुपये किमतीच्या चार दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत़
नाशिक : गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी आलेल्या दुचाकींचे आरसी बुक चोरून त्यानुसार चोरीच्या दुचाकींवर इंजिन नंबर तसेच नंबरप्लेट बदलून त्यांची विक्री करणाऱ्या गॅरेजचालकास मध्यवर्ती गुन्हे शाखा युनिटने अटक केली आहे़ सनी मुरलीधर तांबेरे (२० रा. ध्रुवनगर, कॅनॉलरोड) असे या संशयित गॅरेजमालकाचे नाव असून, त्याच्याकडून सव्वा लाख रुपये किमतीच्या चार दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत़ तांबेरे याचे धु्रवनगरमध्ये दुचाकी दुरुस्तीचे गॅरेज आहे़ या गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी आलेल्या दुचाकींची आरसीबुक व कागदपत्रे चोरून त्यावरील चेसीज, नंबर, इंजिन नंबर व आरटीओ नंबर हा शहराच्या विविध भागांतून चोरलेल्या दुचाकींवर टाकायचा व त्यांची विक्री करण्याचा उद्योग तांबेरे करीत होता़ यामुळे शहरात पोलिसांना एकाच नंबरच्या दोन दुचाकी आढळून येत होत्या़ पोलिसांनी यासाठी संशयित तांबेरेला चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर तोच दुचाकीचोर असल्याचे समोर आले़ शहरात दुचाकीचोरट्यांची टोळीच कार्यरत असून, तांबेरेच्या अटकेमुळे या टोळीचा उलगडा झाला आहे़ पोलिसांनी केलेल्या चौकशीत तांबेरे याने दुचाकीचोरीची कबुली दिली असून चोरीच्या चार दुचाकीही काढून दिल्या आहेत़ या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ मध्यवर्ती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कुमार चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक भीमराव गायकवाड, संजय गामणे, रेवगडे, जनार्दन जाधव, रेखा गायकवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली़