वाहनाची विक्री; जमिनीचा लिलाव स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 05:28 PM2018-08-13T17:28:33+5:302018-08-13T17:29:09+5:30
मुंगसे कांदा खरेदी-विक्री केंद्रावरील कांदा व्यापारी शिवाजी सूर्यवंशी व त्यांची पत्नी सुरेखा सूर्यवंशी यांच्या स्थावर व जंगम मालमत्तेची सोमवारी लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली. मात्र या लिलावात केवळ चारचाकी वाहनाची चार लाख ८० हजाराला विक्री झाली आहे.
तालुक्यातील पिंपळगाव (दा.) येथील माजी सरपंच मीना सुनील पवार यांनी हे वाहन खरेदी केले आहे, तर जमिनीच्या लिलावात कोणीही भाग व अनामत रक्कम भरली नसल्याने लिलाव स्थगित करण्यात आला. या जमिनीचा फेरलिलाव करण्यात येणार आहे.
कसमादे परिसरातील कांदा उत्पादकांचे कांदा विक्री पोटीचे पैसे सूर्यवंशी यांच्याकडे अडकले आहेत. दोन कोटी ९० लाख ५४ हजार २६४ रुपयांसाठी सूर्यवंशी यांच्या मालमत्तेची विक्री करून शेतकऱ्यांचे थकीत पैसे अदा केले जाणार आहेत. सोमवारी सूर्यवंशी यांचे वाहन (क्र. एमएच ४१ व्ही ७४१०) तसेच मुंगसे येथील गट क्रमांक ९१/१ मधील ०.७३ आर क्षेत्र, गट क्रमांक ९१/२ मधील ०.७३ आर क्षेत्र, गट क्रमांक ११२/१ मधील ०.३६.५० आर क्षेत्रासाठी लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली. सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता लिलाव प्रक्रियेला सुरुवात झाली. प्रारंभी वाहनाचा लिलाव करण्यात आला. या लिलाव प्रक्रियेत मीना पवार, मोहन जगताप, दीपक जगताप यांनी भाग घेतला. वाहनाचे मूल्यांकन चार लाख रुपये ठेवण्यात आले होते. ४ लाखाच्या पुढे बोली बोलली जाणार होती. या बोली प्रक्रियेत मीना पवार यांनी चार लाख ८० हजार बोली बोलून वाहन खरेदी केले आहे तर जमिनीचे मूल्यांकन १७२ आर क्षेत्राचे ९२ लाख रुपये धरण्यात आले होते. मात्र या जमिनी लिलाव प्रक्रियेत कोणीही सहभाग घेतला नाही तसेच अनामत रक्कम भरली नाही म्हणून तहसीलदार ज्योती देवरे यांनी जमिनीचा लिलाव स्थगित करत फेरलिलाव घेण्यात येणार असल्याचे घोषित केले. लिलाव प्रक्रियेदरम्यान बाजार समितीचे सभापती राजेंद्र जाधव, उपसभापती सुनील देवरे, शांताराम लाठर, सचिव अशोक देसले, राजाभाऊ खेमनार आदींसह शेतकरी उपस्थित होते.