साल्हेर घाट रस्ता बनला मृत्यूचा सापळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2018 04:55 PM2018-08-02T16:55:55+5:302018-08-02T16:56:30+5:30
सटाणा : बागलाण तालुक्यातील नुकत्याच झालेल्या घाट किटंगच्या सदोष कामामुळे वारंवार दरड कोसळून पश्चिम भागाच्या आदिवासी गावांचा संपर्क तुटून जनजीवन विस्कळीत होत आहे. लाखो रु पये खर्चून केलेला हा घाट रस्ता सध्या मृत्यूचा सापळा बनला असून सदर रस्त्याच्या कामाची गुणवत्ता नियंत्रण विभागामार्फत चौकशी करावी अशी मागणी केली जात आहे.
बागलाण तालुक्यातील पश्चिम भागाच्या आदिवासींचा विकास व्हावा म्हणून शासनाने रस्त्यांचा अनुशेष भरून काढण्यासाठी दरवर्षी लाखो रुपयांचा निधी खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत गेल्या वर्षी वाघंबा साल्हेर दरम्यानच्या साल्हेर घाट रस्त्याचे काम मंजूर करण्यात आले होते.या कामासाठी दोन कोटीहून अधिक निधी मंजूर होऊन गेल्या वर्षी कामाला सुरु वात करण्यात आली. या कामामुळे तब्बल चार ते पाच महिने हा मार्ग बंद ठेवण्यात आला होता. या कामामुळे आदिवासींना अक्षरश: पाच पाच किलोमीटर पायपीट करावी लागत होती. दरम्यान, काम पूर्ण झाले म्हणून या रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. मात्र घाट रस्त्याच्या सदोष कामामुळे पावसाळा सुरु झाल्यापासून वारंवार दरड कोसळून वाहतुकीला अडथळा होत आहे. या घाट रस्त्यामुळे गुजरात व कळवण तालुक्याला जोडणारा जवळचा मार्ग ठरणार आहे. या घाट रस्त्याच्या कामासाठी आतापर्यंत शासनाने दहा कोटीहून अधिक निधी खर्च केला आहे. दरवर्षी एकाच कामाच्या दोन दोन वेळा निविदा देखील काढल्या जातात किरकोळ नावात बदल करून निधी लाटला जात असल्याचे दस्तुरखुद्द ठेकेदार वर्तुळातच उघडपणे चर्चा केली जात आहे. या चर्चेमुळे पुन्हा एकदा अधिकारी , पुढारी आणि ठेकेदार यांची अभद्र युती चव्हाट्यावर आली आहे.
इन्फो
साल्हेर किल्ला सध्या पर्यटकांचे आकर्षण ठरले आहे. किल्ला व परिसर पाहण्यासाठी कोल्हापूर ,पुणे ,सातारा ,मुंबई ,ठाणे , औरंगाबाद, नगर, सोलापूर, जळगाव, धुळे या जिल्ह्यासह गुजरात, मध्यप्रदेशमधील पर्यटक मोठ्या संख्यने साल्हेर येथे हजेरी लावतात.साल्हेर येथे जाण्यासाठी हा एकमेव मार्ग असून वारंवार या घाट रस्त्यात दरड कोसळत असल्यामुळे सदर रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. रस्त्यावर वाहून आलेली माती, त्यात अचानक कोसळलेल्या दगड-गोट्यांमुळे छोट्या-मोठ्या अपघातांना निमंत्रण मिळत आहे.संबधित विभागाने कामाची चौकशी करावी अशी मागणी आदिवासी भागातील नागरिकांकडून केली जात आहे.