अडीच वर्षांपासून साल्हेर ग्रामपंचायत रुग्णवाहिकेच्या प्रतिक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 05:25 PM2020-12-28T17:25:21+5:302020-12-28T17:26:05+5:30
औंदाणे : परिसरातील साल्हेर ग्रामपंचायतीला अडीच वर्षांपूर्वी खासदार निधीतून रुग्णवाहिकेसाठी प्रशासकीय मान्यता मिळूनही, त्याची अद्याप अंमलबजावणी न झाल्याने ग्रामस्थात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
साल्हेर ग्रामपंचायती अंतर्गत पायरपाडा, भिकारसोडा, महारदर, भाटेआंबा, मोठे महारदर अशी गावे येतात. दोन वर्षांपूर्वी विकासकामांच्या उद्घाटनवेळी नवीन रुग्णवाहिका मंजूर असल्याची माहिती देण्यात आली होती. तेव्हा संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे होते. त्यांनी हे गाव दत्तक घेतले आहे. कार्यकर्ते, अधिकारी यांनी ६ नोव्हेंबर, २०१८ रोजी प्रशासकीय मान्यता मिळालेल्या रुग्णवाहिकेच्या उद्घाटनाची तयारी केली होती. मात्र, रात्री उशिरा दौरा झाल्याने रस्त्याच्या बाजूच्या फलकाचे उद्घाटन करून खासदार डांग सौंदाणेकडे रवाना झाले होते. तेव्हापासून आजपर्यंत तब्बल अडीच वर्षे पश्चिम पट्ट्यातील या दुर्गम भागाला रुग्णवाहिकेची प्रतीक्षा आहे. साल्हेर ग्रामपंचायतीला रुग्णवाहिका तत्काळ उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी पंचायत समितीचे माजी सदस्य भास्कर बच्छाव व ग्रामस्थांनी केली आहे.