सुरक्षिततेची काळजी घेत सलुनची दुकाने उघडली ; ग्राहकांचा संमिश्र प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2020 06:56 PM2020-06-28T18:56:22+5:302020-06-28T19:00:23+5:30
तीन महिन्यांच्या कालावधीनंतर अखेर सलूनची दुकाने सुरू करण्याला शासनाने परवानगी दिल्यानंतर रविवारी (दि.२८) नाशिक शहरातील सलूनची दुकाने उघडली असून पहिल्या दिवसांपासून केशकर्तन व्यावसायिकांनी कटिंगचे काम सुरू केले आहे.
नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तीन महिन्यांच्या कालावधीनंतर अखेर सलूनची दुकाने सुरू करण्याला शासनाने परवानगी दिल्यानंतर रविवारी (दि.२८) नाशिक शहरातील सलूनची दुकाने उघडली असून पहिल्या दिवसांपासून केशकर्तन व्यावसायिकांनी कटिंगचे काम सुरू केले आहे. मात्र तूर्तास दाढी करण्याला मनाई करण्यात आलेली असल्याने रविवारी पहिल्या केस कापणाऱ्या ग्राहकांचे प्रमाणे अधिक दिसून आले.
नाशिक शहरात ग्राहकांचा सलूनला पहिल्याच दिवशी संमिश्र प्रतिसाद मिळाला असला तरी दुकाने सुरू झाल्यामुळे व्यावसायिकांचे रोजगाराचे साधन पुन्हा एकदास सुरू झाले आहे. त्यामुळे सलून व्यावसायकिकांकडून समाधान व्यक्त होत असून कोरोनाचे सावट असल्याने सलून व्यावसायिकांकडून सुरक्षिततेची पुरेपूर काळजी घेत काम सुरू करण्यात आले आहे. कोरोनाचे संकट अजूनही टळलेले नसताना पोटापाण्यासाठी सलून व्यावसायिकांना दुकाने सुरू करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करावा लागला. राज्य शासनाने सलून सुरू करण्यास परवानगी दिल्यानंतर शहरातील सलून व्यावसायिकांनी दुकाने उघडली. तीन महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर दुकाने सुरू झाली असली तरी तत्पूर्वी दुकानदारांना चांगलीच पूर्वतयारी करावी लागली. दाढी करण्याला परवानगी देण्यात आली नसल्याने मात्र नाराजीदेखील अनेक व्यावसायिकांनी बोलून दाखविली. कारोनाचा धोका लक्षात घेऊन काम करताना घालण्यात आलेल्या निर्बंधावरील नाराजी अनेकांची उघड केली. दरम्यान, गेल्या अडीच-तीन महिन्यांत झालेल्या नुकसानीच्या भरपाईची मागणीदेखील अनेकांनी केली.