पोलीस स्मृतीदिन : बंदुकीच्या फैरीने शहिदांना मानवंदना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2020 08:04 PM2020-10-21T20:04:46+5:302020-10-21T20:05:03+5:30
यावेळी दिघावकर म्हणाले, अर्धसैनिकी बलाच्या विविध दलातील पोलीस अधिकारी आपले कर्तव्य बजावताना हौतात्म्य पत्करतात त्या शहिदांचे सर्वोच्च बलिदानाचे स्मरण करत देशसेवा व कर्तव्यनिष्ठेची प्रेरणा मिळावी, या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो.
नाशिक : सालाबादप्रमाणे यंदाही बुधवारी (दि.२१) पोलीस मुख्यालयातील कवायत मैदानावर पोलीस प्रशासनाच्या वतीने शहीद पोलिसांच्या स्मृतींना मानवंदना देण्यात आली. यावेळी पोलिसांच्या तुकडीने हवेत बंदुकीच्या फैरी झाडल्या. त्यानंतर उपस्थित वरिष्ठ अधिकारी वर्गाने स्मृतीस्तंभावर पुष्पचक्र अर्पण केले.
२१ ऑक्टोबर १९५९ रोजी लडाखमधील भारताच्या सीमेवर केंद्रीय राखीव पोलीस दलातील दहा जवान गस्तीवर घालत होते. त्यावेळी दबा धरून बसलेल्या चिनी सैनिकांनी हल्ला केल्याने गस्तीवरील पोलिसांना वीरमरण आले होते. या वीर जवानांनी दाखवलेल्या अतुलनीय शौर्यापासून इतरांनी प्रेरणा घ्यावी तसेच आपल्या कर्तव्य व राष्ट्रनिष्ठेची जाणीव सदैव मनात ठेवावी म्हणून शहीद पोलिसांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी २१ ऑक्टोबर हा दिवस संपूर्ण देशात पोलीस स्मृती दिन म्हणून पाळला जातो.
त्या औचित्यावर पोलिस प्रशासनाच्या वतीने मुख्यालयात बुधवारी सकाळी स्मृतीदिन सोहळा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी विभागीय पोलीस आयुक्त राधाकृष्ण गमे, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रतापराव दिघावकर, पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय, पोलीस अधिक्षक सचीन पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोडे आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, कवायत मैदानावर हजर असलेल्या पोलिसांच्या तुकडीने बंदुकीच्या फैरी झाडल्या. तसेच पोलीस बॅन्ड पथकाने विशेष शहीद स्मृती धून वाजविली. यावेळी शहीद झालेल्या त्या शुरवीर शहीद पोलिसांच्या नामोल्लेख करण्यात आला. या सोहळ्यादरम्यान सुरक्षित सामाजिक अंतर राखण्यात आले. तसेच अधिकारी व कर्मचारी यांनी मास्कचाही वापर केल्याचे दिसून आले.