वर्गमित्र असलेल्या निवृत्त जवानाला मानवंदना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2019 04:49 PM2019-03-02T16:49:05+5:302019-03-02T16:49:12+5:30
माजी विद्यार्थ्यांचा उपक्रम : मेशीत काढली मिरवणूक
देवळा : एखाद्या हॉटेलात जमायचे आणि मौजमजा करायची, असले फॅड आता माजी विद्यार्थ्यांमध्ये बघायला मिळते. परंतु, मेशी येथील विद्यालयातील दहावीच्या १९९३ च्या बॅचमधील विद्यार्थ्यांनी एकत्र येत आपलाच वर्गमित्र असलेल्या आणि भारतीय सैन्य दलात नायक पदावरून निवृत्त झालेल्या जवानाची मिरवणूक काढून त्याला अनोखी मानवंदना दिली.
देवळा तालुक्यातील मेशी येथील १९९३ या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थी देविदास बळीराम शिरसाठ हे १९९७ साली सैन्य दलातील इलेक्ट्रिक मशीन इंजिनियर कोअर मध्ये भरती झाले. सेवा कालावधीत ते कारगिल, जम्मू काश्मीर, नागालँड, नवी दिल्ली, नाशिक, हिस्सार आदी ठिकाणी कर्तव्यावर होते. कारगिल युद्धात त्यांनी सहभाग घेतला होता. बावीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर आपला वर्गमित्र निवृत्त होत असल्याचे त्यांच्या वर्गमित्रांना कळल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या या माजी विद्यार्थ्यांनी भारत मातेच्या सुपुत्राने केलेल्या देशसेवेबद्दल मानवंदना देण्यासाठी एकत्र येण्याचे ठरवले, त्यानुसार शिरसाठ हे मेशी या मुळ गावी परतल्यावर त्यांची गावातून पारंपारिक पद्धतीने लेझिम पथकाच्या संचलनात मेशी माध्यमिक विद्यालयात मानवंदना देण्यात आली. त्यानंतर शाळा ते जगदंबा माता मंदिरा पर्यंत मिरवणूक काढून मंदिर सभागृहात सर्व वर्गमित्रांच्यावतीने त्यांचा सपत्नीक सन्मान चिन्ह व पुष्पहार देऊन सन्मान करण्यात आला. अतिशय स्तुत्य व अभिनव पद्धतीने साजरा केलेल्या या गेट-टुगेदरचे गावकऱ्यांनाही कौतुक वाटले. यावेळी विलास कुमावत, वसंत शिरसाठ, राजू शिरसाठ, मनोहर पगार, प्रमोद आहेर, विष्णू जाधव, दिनकर कुमावत, मधुकर शिरसाठ, विनय बागुल, दयाराम सावंत, चिंतामण सोनवणे, रघु पगारे, मनीष जाधव, रवींद्र आहेर, रेखा कुवर, दिनेश खैरणार, विलास पवार, सुजाता आहिरे आदीसह अनेक वर्गमित्र उपस्थित होते.