‘समाज गौरव’ पुरस्काराने समाजभूषणांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 12:44 AM2018-12-26T00:44:12+5:302018-12-26T00:44:30+5:30
विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ब्राह्मण समाजातील समाजभूषणांना अखिल ब्राह्मण मध्यवर्ती आणि समाज सहायक संस्थेच्या वतीने समाज गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
नाशिक : विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ब्राह्मण समाजातील समाजभूषणांना अखिल ब्राह्मण मध्यवर्ती आणि समाज सहायक संस्थेच्या वतीने समाज गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संस्थेचे समाजोपयोगी कार्य नक्कीच प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन शंकराचार्य संकेश्वर पीठाचे श्री विद्यानृसिंह भारती यांनी केले. ब्राह्मण मध्यवर्ती संस्था, नाशिकच्या ४६व्या वर्धापनदिनानिमित्त मंगळवारी (दि.२५) समाजातील धार्मिक, कृषी, शिक्षण, अंतराळ-विज्ञान व संशोधन आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाºया व समाजभूषण ठरलेल्या व्यक्तींना ‘समाज गौरव पुरस्कार’ सन्मानपूर्वक शंकराचार्य विद्यानृसिंह भारती यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून दीपक करंजीकर, संस्थेचे अध्यक्ष अॅड. गणेश गोखले, विनायक जाधव महाराज आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी जाधव म्हणाले, ब्राह्मण समाज धार्मिक परंपरेनुसार चालणारा समाज आहे. देवाजवळ सर्वांत अग्रस्थानी असलेला हा ब्राह्मण समाज परिपूर्ण अद्भुत असा वर्ण आहे. प्रास्ताविक उदयकुमार मुंगी यांनी केले. सूत्रसंचालन सुभाष सबनीस यांनी केले, तर मानपत्राचे वाचन मिलिंद गांधी यांनी केले व आभार चंद्रशेखर जोशी यांनी मानले.
यावेळी भारती यांनी समाजाला उद्देशून बोलताना सांगितले समाज गौरव पुरस्कार हा स्तुत्य उपक्रम असून, संस्थेच्या कार्य उत्तरोत्तर असेच प्रगती करत राहो, दरम्यान, त्यांच्या हस्ते सुभाषगिरी महाराज (धार्मिक परंपरा), माधव बर्वे (कृषी, कोठुरे), सचिन जोशी (शिक्षण), अपूर्वा जाखडी (अंतराळ), विनायक जाधव महाराज (सामाजिक), जयंत नातू (विशेष सन्मान) यांना मानपत्र, सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.