घंटागाडी, टीडीआर घोटाळा चौकशीसाठी समित्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2019 01:21 AM2019-01-26T01:21:45+5:302019-01-26T01:23:53+5:30
शहरातील अनियमित घंटागाड्या चालवणाऱ्या ठेकेदारांकडून होणारा कराराचा भंग तसेच तसेच कथित टीडीआर घोटाळ्याच्या चौकशीसाठी प्रशासनाच्या वतीने दोन समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. दरम्यान, २१ कोटी रुपयांच्या टीडीआर घोटाळ्याच्या चौकशीवरूनदेखील बरेच वादंग झाले
नाशिक : शहरातील अनियमित घंटागाड्या चालवणाऱ्या ठेकेदारांकडून होणारा कराराचा भंग तसेच तसेच कथित टीडीआर घोटाळ्याच्या चौकशीसाठी प्रशासनाच्या वतीने दोन समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. दरम्यान, २१ कोटी रुपयांच्या टीडीआर घोटाळ्याच्या चौकशीवरूनदेखील बरेच वादंग झाले. विशेषत: उपसमितीदेखील नेमण्याचा विषय बारगळला गेल्याने त्यावर विरोधीपक्षाच्या नगरसेवकांनी थेट भाजपा सरकारवर आणि सभापतींवर टीका केली.
स्थायी समितीची सभा शुक्रवारी (दि.२२) सभापती हिमगौरी आडके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी घंटागाड्या आणि टीडीआर घोटाळ्याच्या चौकशीसाठी दोन समित्या गठीत करण्यात आल्याची माहिती प्रशासन उपआयुक्त महेश बच्छाव यांनी दिली. घंटागाडीसंदर्भातील आरोपांच्या चौकशीसाठी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त हरिभाऊ फडोळ, यांत्रिकी विभागाचे प्रमुख शिवाजी चव्हाणके व डॉ. मनोज चौधरी यांची समिती गठीत करण्यात आली, तर टीडीआर संदर्भात अतिरिक्तआयुक्त हरिभाऊ फडोळ आणि अधीक्षक अभियंता नलावडे यांची नियुक्त केल्याचे जाहीर केले. मुळातच २१ कोटी संदर्भात
उपसमिती तयार करण्याचे सभापती हिमगौरी आडके यांनी जाहीर केले होते.
मात्र, परंतु अशी समिती घोषित केली नाही त्याचप्रमाणे अन्य दोन विषयांसदर्भात चौकशी समित्यांमध्ये स्थायी समितीच्या सदस्यांचा समावेश करण्याची मागणीही फेटाळण्यात आली. त्यामुळे शिवसेनेसह अन्य विरोधकांनी संताप व्यक्त केला. प्रवीण तिदमे यांनी आकाशवाणी केंद्राजवळील भूखंडापोटी स्थायी समितीच्या १२ सदस्यांचा विरोध असतानाही २१ कोटी रुपयांच्या मोबदला देण्यात आल्याच्या प्रकरणात भाजपाचे सदस्य शांत झाले असले तरी आपण त्यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आली असून, आपण शांत बसणार नाही, असे सांगितले. दिनकर पाटील यांनी आपण शांत बसलो नसून या प्रकरणात प्रशासनाला पत्र दिले आहे, त्यामुळे राजकीय टीका करू नये, असे सांगितले.
मुशीर सय्यद यांनी घंटागाडी प्रकरणात अनेक प्रकारचे गोंधळ आहेत. त्यामुळेच अधिकारी एकमेकांना पाठीशी घालू नये यासाठीच स्थायी समितीने चौकशी समिती गठीत करण्याची मागणी केली होती.
यापूर्वी स्थायी समितीने अनेक समित्या गठीत केल्या त्या बेकायदेशीर होत्या काय? असा प्रश्न संतोष साळवे यांनी केला, तर भगवान आरोटे यांनी भाजपाच्या पारदर्शक कामाचा प्रश्न उपस्थित केला. २१ कोटी रुपयांच्या भूखंड प्रकरणात महापालिकेने दिलेली रक्कम परत करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी सांगतात, तेव्हाच या प्रकरणात तथ्य असल्याचे सिद्ध होते, असे भगवान आरोटे यांंनी सांगितले.
मुशीर सय्यद- उद्धव निमसे यांच्यात कलगीतुरा
अपक्ष नगरसेवक मुशीर सय्यद यांनी घंटागाडीच्या विषयाचे निमित्त करून समितीच्या बैठकीत भाजपावर जोरदार टीका करीत सरकारलाही लक्ष केले. महापालिकेत भाजपाची सत्ता आहे, मात्र करवाढ आणि अन्य मुद्दे बघता भाजपाला यासाठीच लोकांनी निवडून दिले की काय? असा पश्चाताप लोकांना होत आहे. गेल्या वर्षभरापासून कर वाढ रद्द करण्याचा ठराव करूनही उपयोग झाला नाही. भाजपा सरकारने नाशिककरांची कोंडीच करायचे ठरवले आहे काय? असा प्रश्न केला. तर त्याला अत्यंत शांतपणे उत्तर देताना उद्धव निमसे यांनी मुशीर सय्यद सभागृहाबाहेर गोड बोलतात, मात्र येथे आल्यावर त्यांच्यात बदल होतो असे सांगतानाच करवाढीचा ठराव रद्द करण्यासाठी भाजपानेच पुढाकार घेतल्याचे स्मरण करून देतानाच मुशीर यांच्या आरडाओडीचे कारण काय आहे हे सर्वांना माहिती आहे, असा सूचक टोला लावल्यानंतर काहीसा गोंधळही झाला.