समता परिषद पुन्हा भरारी घेणार? भुजबळांच्या भूमिकेकडे लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 05:03 AM2018-06-23T05:03:56+5:302018-06-23T05:04:04+5:30
देशभरातील समता परिषदेच्या कार्यकर्त्यांना पुन्हा एका झेंड्याखाली आणण्याची तयारी अखिल भारतीय समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष छगन भुजबळ यांनी चालविली आहे.
- श्याम बागुल
नाशिक : देशभरातील समता परिषदेच्या कार्यकर्त्यांना पुन्हा एका झेंड्याखाली आणण्याची तयारी अखिल भारतीय समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष छगन भुजबळ यांनी चालविली आहे. तब्बल तीन वर्षांनंतर रविवारी मुंबईत याबाबत विस्तृत राज्य कार्यकारिणीची बैठक बोलविण्यात आली आहे.
भुजबळ यांच्यावर राजकीय संकट ओढवल्यानंतर ते त्यातून बाहेर पडले. त्या त्या वेळी अखिल भारतीय समता परिषदेचा मेळावा व बैठक घेऊन त्यांनी नवी भरारी घेतली आहे. मुंबईतील बैठकीत समता परिषदेचा मेळावा भरविण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
डिसेंबर २०१४ मध्ये मुंबईत अखिल भारतीय समता परिषदेची अखेरची बैठक भुजबळ यांच्या उपस्थितीत झाली होती. त्यावेळी महाराष्टÑ सदन घोटाळा, लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने सुरू केलेली चौकशी याबाबत भुजबळ यांनी आपले म्हणणे सैनिकांसमोर मांडून आरोप खोडून काढले होते. त्या नंतर भुजबळ यांच्या उपस्थितीत जानेवारी २०१५ मध्ये समता परिषदेचा अखेरचा मेळावा मध्य प्रदेशातील सतना येथे झाला होता.