छगन भुजबळांनी निवडणूक लढविण्याबाबत फेरविचार करावा, समता परिषदेची मागणी
By संजय पाठक | Updated: April 23, 2024 15:13 IST2024-04-23T15:12:45+5:302024-04-23T15:13:21+5:30
Lok Sabha Election 2024 : समता परिषदेची बैठक आज भुजबळ फार्म येथे घेण्यात आली.

छगन भुजबळांनी निवडणूक लढविण्याबाबत फेरविचार करावा, समता परिषदेची मागणी
नाशिक - लोकसभेच्या नाशिकच्या जागेसाठी घमासान सुरूच असून उमेदवारी वेळेत घोषित होत नसल्याने राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी उमेदवारीच्या स्पर्धेतून माघार घेत असल्याचे गेल्या आठवड्यात जाहीर केले होते, मात्र त्यांनी आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा आणि निवडणूक लढवावी अशी मागणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे.
या समता परिषदेची बैठक आज भुजबळ फार्म येथे घेण्यात आली. दिलीप खैरे आणि बाळासाहेब कर्डक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत भुजबळ यांनी याबाबत तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली. नाशिक लोकसभा मतदारसंघातून भुजबळ यांनी निवडणूक लढवावी अशी केंद्रातील भाजपाच्या नेत्यांची इच्छा आहे.
देशाच्या सर्वोच्च संसदेमध्ये ओबीसींच्या हक्क मांडण्यासाठी छगन भुजबळ यांच्यासारखा नेता हवा आहे. मात्र त्यांची इच्छा असतानाही स्थानिक स्तरावर राज्य स्तरावर उमेदवारी वेळेत घोषित न झाल्यामुळे भुजबळ यांनी उमेदवारीच्या स्पर्धेतून माघार घेतली आहे. मात्र त्यांनी त्याचा फेरविचार करावा अशी मागणी यावेळी विविध वक्त्यांनी केली. विदर्भ ब्राह्मण विकास मंचच्यावतीने छगन भुजबळ यांना पाठिंबा देत असल्याचे सचिव रूपेश जोशी यांनी यावेळी सांगितले.