समता ज्येष्ठ नागरिक संघ ५५ विद्यार्थ्यांचा खर्च उचलणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 12:55 AM2018-07-17T00:55:43+5:302018-07-17T00:56:06+5:30
नाशिक : आदिवासी दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी समता ज्येष्ठ नागरिक संघाने अभिनव उपक्रम हाती घेतला असून, गुणवत्ता असलेल्या इयत्ता दहावीच्या ५५ विद्यार्थ्यांचे परीक्षेचे अर्ज भरण्याची जबाबदारी संघाने उचलली आहे.
आदिवासी भागातील मुलांचे शिक्षण अनेकविध कारणांमुळे अपूर्ण राहते. त्यांच्यात चांगली गुणवत्ता असूनही त्यांना केवळ आर्थिक परिस्थितीमुळे कित्येकदा शिक्षण सोडण्याची वेळ येते. या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासात खंड पडू नये तसेच दहावीचे महत्त्वाचे वर्ष लक्षात घेऊन समता ज्येष्ठ नागरिक संघाने पांजरे येथील नूतन विद्यालयातील इयत्ता दहावीतील ५५ विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज भरण्याची जबाबदारी घेतली आहे.
पखालरोडवरील समता ज्येष्ठ नागरिक संघाकडून राबविण्यात येणाऱ्या अनेक सामाजिक कार्यात शिक्षणाला अग्रक्रम असून, यासाठी ज्येष्ठ नागरिकांकडून मदतीचा हात पुढे केला जातो. अकोले तालुक्यातील पांजरे येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील सुमारे ३०० विद्यार्थ्यांना ज्येष्ठ नागरिक संघाकडून शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीराम ठाकूर होते. व्यासपीठावर उपाध्यक्ष डी. एफ. मोरे, सचिव दीनानाथ पाटील, बळवंत शिर्के, शांताराम पोटे, आर. एस. गरुड, चिंतामण अहेर, कृषी अधिकारी व्ही. आर. बांंबळे, मुख्याध्यापक पी. वाय. लांडगे, सुमन देशमुख उपस्थित होते.
या उपक्रमात दीनानाथ पाटील, चिंतामण अहेर, डॉ. ए. जी. वाणी यांचे सहकार्य लाभणार असल्याचे अध्यक्ष ठाकूर यांनी सांगितले. मुख्याध्यापक लांडगे यांनीही मनोगत व्यक्त केले. पाहुण्यांचे स्वागत अर्जुन शेळके यांनी केले. प्रास्ताविक आर. आर. गरुड यांनी केले. रा. शि. शिंदे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. ए. जी. वाणी, व्ही. एस. रासने, प्रा. घोडे, जाधव, संतू भावसार यांचे सहकार्य लाभले.