सांबरखल गावातील जि. प. शाळेची अवस्था वाईट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2022 12:01 AM2022-06-26T00:01:29+5:302022-06-26T00:02:17+5:30
बोरगाव : पंचायत समिती सुरगाणा येथे मौजे रोंगाने गट ग्रामपंचायतींतर्गत एकूण सहा आदिवासी पाड्यांचा समावेश असून, यापैकी सांबरखल गावातील जि. प. शाळेची अवस्था अत्यंत वाईट झालेली आहे.
बोरगाव : पंचायत समिती सुरगाणा येथे मौजे रोंगाने गट ग्रामपंचायतींतर्गत एकूण सहा आदिवासी पाड्यांचा समावेश असून, यापैकी सांबरखल गावातील जि. प. शाळेची अवस्था अत्यंत वाईट झालेली आहे.
या शाळेच्या दुरुस्तीचे काम तत्काळ सुरू करावे या व इतर प्रमुख मागण्यांकरिता श्रमजीवी संघटनेच्या वतीने पंचायत समिती सुरगाणा येथे धडक आंदोलन करण्यात आले. यामध्ये गेल्या वर्षीपासूनच सांबरखल गावातील शाळा वादळ-वाऱ्याचा व पावसाचा सामना करत जिल्हा परिषद शाळेची इमारत मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन शेवटच्या घटका मोजत आहे. त्यामुळे गावातील विद्यार्थ्यांच्या आयुष्याला धोका निर्माण झाला आहे.
विद्यार्थ्यांच्या या विषयावर गावातील नागरिकांनी सुरगाणा पंचायत समितीस शाळा दुरुस्तीसाठी पत्रव्यवहार करून ही गटशिक्षणाधिकारी यांनी शाळेकडे दुर्लक्ष केले. शाळा नाही म्हणून शाळेतील विद्यार्थी कुठंतरी मंदिर किंवा झाडाखाली बसून शिक्षण घेत होते. श्रमजीवी संघटनेच्या वतीने वेळोवेळी पंचायत समिती येथे आंदोलन करण्यात आले असून, गटशिक्षणाधिकारी यांच्या वतीने तात्पुरती आश्वासने देऊन जि. प. शाळा सांबरखल येथील १५ जूनपर्यंत सर्व वर्ग खोल्या दुरुस्त करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. परंतु १५ जून होऊनही जि. प. शाळेची अवस्था जैसे थे अशीच आहे.
कोरोनानंतर १५ जूनपासून प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्या असून, गटशिक्षणाधिकारी यांनी शाळेची कोणत्याही प्रकारची दुरुस्ती केलेली नाही. देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना आदिवासी पाड्यावरील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी चार भिंतींची शाळाच असू नये ही देशासाठी लाजिरवाणी बाब असल्याचे श्रमजीवी संघटनेचे नाशिक जिल्ह्या उपाध्यक्ष राजू राउत, तालुका सचिव दिनेश मिसाळ, केशव गुंबाडे, तालुका उपाध्यक्ष सीताराम सापटे यांनी यावेळी मत व्यक्त केले.
गरीब आदिवासींच्या विद्यार्थ्यांना शाळेत बसण्यासाठी इमारत नाही. यासाठी श्रमजीवी संघटनेने नुकतेच आंदोलन केले, यामध्ये जोपर्यंत इमारत बांधकामास सुरुवात होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन असेच चालूच राहील, अशी भूमिका संघटनेच्या वतीने घेण्यात आली आहे.
- राजू राऊत, तालुका अध्यक्ष, श्रमजीवी संघटना