‘समृद्धी’ महामार्गावर वाचणार वन्यप्राण्यांचा जीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 01:16 AM2018-11-19T01:16:17+5:302018-11-19T01:17:27+5:30
मुंबई-नागपूरला जोडणारा एक्स्प्रेस महामार्ग अर्थात महाराष्टÑ समृद्धी महामार्ग विकसित करताना दूरदृष्टीचा अवलंब करीत वन्यजीवांच्या संवर्धन व संरक्षणाचा विचार केला जात आहे. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, सिन्नर तालुक्यांमधून जाणाऱ्या महामार्गावर एकूण सात ठिकाणी केवळ वन्यजिवांच्या हालचालींसाठी भुयारी मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. यामुळे ‘समृद्धी’वर मुंबई-आग्रा महामार्गाप्रमाणे वन्यजिवांचा जीव जाणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
अझहर शेख । नाशिक : मुंबई-नागपूरला जोडणारा एक्स्प्रेस महामार्ग अर्थात महाराष्टÑ समृद्धी महामार्ग विकसित करताना दूरदृष्टीचा अवलंब करीत वन्यजीवांच्या संवर्धन व संरक्षणाचा विचार केला जात आहे. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, सिन्नर तालुक्यांमधून जाणाऱ्या महामार्गावर एकूण सात ठिकाणी केवळ वन्यजिवांच्या हालचालींसाठी भुयारी मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. यामुळे ‘समृद्धी’वर मुंबई-आग्रा महामार्गाप्रमाणे वन्यजिवांचा जीव जाणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
सुमारे ७१० किलोमीटर लांबीचा समृद्धी विकास महामार्ग एकूण दहा ते बारा जिल्ह्यांमधील सुमारे ३५६ गावांमधून जातो. हा प्रकल्प येत्या २०२०पर्यंत पूर्णत्वास येणार असल्याचे बोलले जात आहे. ‘समृद्धी’वर ३१ टोलनाके असणार आहे. हा समृद्धी महामार्ग जंगलांच्या भागातूनही जाणार असल्याने महामार्ग विकसित करताना वन्यजिवांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले जाणार आहे. त्यामुळे राष्टÑीय वन्यजीव संस्थेने ‘समृद्धी’ला संमती दर्शविली आहे.
नुकतेच नाशिक पश्चिम वनविभागाकडून समृद्धी महामार्ग संबंधित कंपन्यांच्या अधिकाºयांनी इगतपुरी, सिन्नर या तालुक्यांमधील वनपरिक्षेत्राची माहिती प्राप्त करून घेतली आहे. त्यानुसार या दोन्ही तालुक्यांमधील वनपरिक्षेत्रांतर्गत महामार्गावर वन्यजिवांकरिता भुयारी मार्ग तयार करून पर्यायी रस्ता उपलब्ध क रून दिला जाणार आहे. इगतपुरी वनपरिक्षेत्रात दोन, तर सिन्नर वनपरिक्षेत्रात एकूण पाच ठिकाणे सध्या निश्चित करण्यात आल्याची माहिती उपवनसंरक्षक टी.ब्यूला.एलील मती यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
‘रोडकिल’च्या समस्येला बसणार आळा
वन्यजिवांच्या मुक्तसंचार महामार्गालगतच्या वनक्षेत्रांमध्ये नेहमीच धोक्यात येतो. महामार्ग ओलांडतांना अनेकदा वाहनांच्या धडकेत वन्यजीव अपघातात जागीच गतप्राण होतात. ‘रोडकिल’ची वाढती समस्या वन्यजिवांच्या मुळावर उठली आहे. महामार्गावर वन्यजिवांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचा मृतदेह खाण्यासाठी मृत प्राण्यांवर भूक भागविणारे अन्य वन्यजीव रात्रीच्या सुमारास तेथे येतात आणि त्यांचाही वाहनांखाली चिरडून मृत्यू होतो, अशा या ‘रोडकिल’च्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी ‘समृद्धी’ विकसित करताना उपाययोजना केल्या जाणार आहे.
येथे असणार प्राण्यांचा भुयारी मार्ग
समृद्धी महामार्गावरील इगतपुरी वनपरिक्षेत्रातील बिबट्यांसह अन्य प्राण्यांचा वावर असलेल्या गावांच्या शिवारात दोन, तर सिन्नर वनपरिक्षेत्राच्या हद्दीत शिवडे, घोरवड, खंबाळे या तीन गावांसह अन्य दोन ठिकाणांवर भुयारी मार्ग तयार करण्यात येणार आहे. या भुयारी मार्गांमुळे वन्यप्राण्यांना थेट महामार्गाच्या विरुद्ध दिशेला सहजरीत्या सुरक्षित ये-जा करता येणार आहे.