सॅम्युअलला पोलिसांचा अनोखा ‘सॅल्यूट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 01:15 AM2019-06-26T01:15:36+5:302019-06-26T01:15:57+5:30
जिवाची पर्वा न करता प्रसंगावधान राखत धाडस दाखवून सशस्त्र दरोडेखोरांशी झुंज देणाऱ्या मुथूट फायनान्स कार्यालयाचा युवा अभियंता मुरियायिकारा साजू सॅम्युअलने (२९, रा. मूळ केरळ) शौर्यपूर्ण कामगिरी बजावली.
नाशिक : जिवाची पर्वा न करता प्रसंगावधान राखत धाडस दाखवून सशस्त्र दरोडेखोरांशी झुंज देणाऱ्या मुथूट फायनान्स कार्यालयाचा युवा अभियंता मुरियायिकारा साजू सॅम्युअलने (२९, रा. मूळ केरळ) शौर्यपूर्ण कामगिरी बजावली. त्याचा आक्रमक प्रतिकार थोपविण्यासाठी दरोडेखोरांनी त्याच्यावर गोळीबार केला. यामुळे सॅम्युअलचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. सॅम्युअलच्या धाडसाचे कौतुक करत शहर पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखांच्या तपासी पथकाला मिळालेली प्रत्येकी ७० हजार असे एकूण दोन लाख दहा हजार रुपयांच्या बक्षिसाची रक्कम सॅम्युअल कुटुंबाला मदत म्हणून देण्याचे सहायक आयुक्त रमेश पाटील यांनी जाहीर केले.
सहा फूट उंचीच्या धाडसी सॅम्युअलने दरोडेखोरांचा हल्ला रोखण्यासाठी थेट आपत्कालीन अलार्म वाजविला. यामुळे सर्वांना धोक्याची जाणीव झाली आणि दरोडेखोर बिथरले. दरोडेखोरांना त्यांचा कट उद््ध्वस्त होण्याची भीती निर्माण झाली. झटापट करणाºया सॅम्यूअलवर चिडलेल्या परमेंदरने पिस्तूलने तीन गोळ्या त्याच्या शरीरावर झाडल्या. काही सेकंदात सॅम्यूअल रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. यानंतर परमेंदरचा साथीदार संशयित हल्लेखोर आकाशसिंग याने त्याच्याजवळी पिस्तूलने दोन गोळ्या झाडून पळ काढला.
जिवावर उदार होऊन सॅम्यूअलने कुठल्याही बाबीचा विचार न करता कार्यालय व त्यामधील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा विचार करत दरोडेखोरांसोबत झुंज दिली. त्यामुळे ग्राहकांचे कोट्यवधींचे सोने सुरक्षित राहिले. सॅम्युअलच्या या धाडसाने पोलिसांचीही मने जिंकली. या हल्ल्यात निष्पाप सॅम्यूअलचा मृत्यू झाल्याने शहर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, उपआयुक्त पौर्णिमा चौगुले यांच्यासह गुन्हे शाखांचे तपासी पथकाने या गुन्ह्याचा छडा लावण्याचा चंग बांधला. राज्यासह परराज्यांमध्ये पोलिसांचे दहा पथक या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी सक्रीय आहेत़ तीन पथकांना दोन संशयित आरोपींना ताब्यात घेण्यास यश आले असून गुन्ह्याचाही उलघडा झाला आहे़
सॅम्युअलला सात महिन्यांची चिमुकली
सॅम्युअल हा अभियंता होता. मुंबईच्या विभागीय कार्यालयातून नाशिकच्या मुथूट कार्यालयातील यंत्रणेची दुरुस्ती करण्यासाठी सॅम्युअल आला होता. सॅम्युअल विवाहित असून, त्याच्या पश्चात पत्नी व सात महिन्यांचे बाळ आहे. सॅम्युअल कुटुंबाचा मोठा आधार होता. याची जाणीव ठेवत पोलिसांनी त्याच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीचा हात दिला.
सॅम्युअल कुटुंबाला दिला मदतीचा हात
४आठवडाभरात पोलिसांनी या गुन्ह्याचा उलगडा करत आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केला. गुन्ह्याचा सूत्रधार जितेंद्रसिंग व शूटर परमेंद्र सिंगला बेड्या ठोकल्या. आठवडाभरात आव्हानात्मक गुन्ह्याचा छडा लावल्याबद्दल नांगरे-पाटील यांनी तीनही तपासी पथकांना प्रत्येकी ७० हजारांचे बक्षीस जाहीर केले. सामाजिक संवेदना जागृत ठेवत पोलिसांच्या तपास पथकांनी बक्षिसाची मिळालेली दोन लाख दहा हजारांची रक्कम सॅम्युअल कुटुंबाला मदत म्हणून देण्याचा निर्णय घेत अनोखा ‘सॅल्यूट’ केला.