पंधरा दिवसांपासून सामुंडीकर अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:10 AM2021-07-05T04:10:53+5:302021-07-05T04:10:53+5:30

देवगाव : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सामुंडी येथील विद्युत रोहित्र गेल्या पंधरा दिवसांपासून नादुरुस्त झाले असून, गावातील नागरिकांसह विद्यार्थ्यांचे अतोनात हाल ...

Samundikar has been in darkness for fifteen days | पंधरा दिवसांपासून सामुंडीकर अंधारात

पंधरा दिवसांपासून सामुंडीकर अंधारात

Next

देवगाव : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सामुंडी येथील विद्युत रोहित्र गेल्या पंधरा दिवसांपासून नादुरुस्त झाले असून, गावातील नागरिकांसह विद्यार्थ्यांचे अतोनात हाल होत आहेत. तसेच बँकेच्या व्यवहारात खंड पडत असून, नागरिकांचे ऐन शेतीकामाच्या हंगामात आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. यासंदर्भात महावितरण विभागाकडे वारंवार तक्रार करूनही दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सामुंडी महसूल गाव असून, आर्थिक उलाढालीकरिता गावात एक बँक आहे. या बँकेत तालुक्यातील आदिवासी दुर्गम भागातील सुमारे ७० ते ८० गावे, वाडी-वस्त्यांचा व्यवहार बँकेत आहे. मात्र, तब्बल पंधरा दिवसांपासून विद्युत रोहित्र नादुरुस्त झाल्याने विजेअभावी बँकेचे कामकाज बंद असून, आर्थिक व्यवहारदेखील ठप्प झाले आहेत. त्यामुळे ग्रामीण आदिवासी, दुर्गम भागातील गोरगरिबांना आर्थिक व्यवहार करताना अडचणी निर्माण होत आहेत. तसेच १५ जूनपासून विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिकवणीचे वर्ग सुरू झाले असल्याने विजेअभावी मोबाइल चार्जिंग नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत असून, शिक्षकांनी दिलेल्या दररोजच्या अभ्यासाला मुकावे लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शालेय नुकसान होत आहे.

महावितरण विभागाने सामुंडी गावकरिता २५ अश्वशक्तीचे रोहित्र बसविले होते. मात्र, ते नादुरुस्त होऊन नागरिकांना तब्बल पंधरा दिवसांपासून अंधाराचा सामना करावा लागत आहे. ऐन पावसाळ्याच्या दिवसात विजेअभावी दिवस काढावे लागत आहे, तर विजेच्या कमतरतेमुळे विजेवर चालणाऱ्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वापर होत नसल्याने त्या शोभेच्या वस्तू ठरत आहेत.

इन्फो

आश्वासनाचा विसर

महावितरण विभागाकडे नागरिकांनी यासंदर्भात तक्रार केली होती. त्या बदल्यात वीज मंडळाने गावकऱ्यांना आठ दिवसांत रोहित्र बसविले जाईल, असे आश्वासन दिले होते. मात्र, आठ दिवस उलटूनही रोहित्र न बसविल्याने महावितरणचे खोटे आश्वासन व विद्युत रोहित्र शिल्लक नसल्याचे कारण देऊन टाळाटाळ केली जात असल्याचादेखील आरोप गावकऱ्यांनी केला आहे.

कोट

गेल्या पंधरा दिवसांपासून विजेअभावी बँकेचे कामकाज बंद असून, ज्येष्ठ नागरिक, निराधार महिला व घरकुल लाभार्थी आदींना विजेअभावी बँकेचा व्यवहार ठप्प असल्याचा फटका बसत आहे. मात्र, नागरिकांची निकड लक्षात घेऊन त्र्यंबकेश्वर शाखेकडे व्यवस्था केली आहे. परंतु, त्यातही त्यांना दळणवळणाकरिता आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.

- शरद अमोडे, शाखा व्यवस्थापक, कॅनरा बँक, सामुंडी

कोट....

सामुंडी येथील रोहित्र नादुरुस्त झाल्याची तक्रार आमच्याकडे आली असून, सामुंडी गावाकरिता आवश्यक असलेला २५ अश्वशक्तीचा रोहित्र उपलब्ध नसल्याने विलंब होत आहे. त्यासंदर्भात पाठपुरावा सुरू आहे.

- किशोर सरनाईक, उपअभियंता महावितरण, त्र्यंबकेश्वर

फोटो- ०४ सामुंडी

सामुंडी येथील नादुरुस्त विद्युत रोहित्र.

040721\04nsk_13_04072021_13.jpg

फोटो- ०४ सामुंडीसामुंडी येथील नादुरुस्त असलेले विद्युत रोहित्र. 

Web Title: Samundikar has been in darkness for fifteen days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.