आशा स्वयंसेविका आंदोलनाच्या पवित्र्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:11 AM2021-06-11T04:11:08+5:302021-06-11T04:11:08+5:30
सिन्नर : आशा स्वयंसेविका आणि गट प्रवर्तकांचे विविध प्रश्न सोमवार (दि. १४) पर्यंत न सोडविल्यास मंगळवारी (दि. १५) स्वयंसेविका ...
सिन्नर : आशा स्वयंसेविका आणि गट प्रवर्तकांचे विविध प्रश्न सोमवार (दि. १४) पर्यंत न सोडविल्यास मंगळवारी (दि. १५) स्वयंसेविका आणि गट प्रवर्तकांचा राज्यव्यापी एक दिवसीय लाक्षणिक संप आणि त्यानंतर प्रसंगी कोरोना कामकाजावर बहिष्कार टाकणार असल्याचे निवेदन आयटकच्या महाराष्ट्र राज्य आशा व गटप्रवर्तक संघटनेने दिले आहे. आपल्या विविध मागण्यांचे निवेदन त्यांनी सिन्नरचे तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी यांना दिले. मार्च २०२१ पासून ग्रामीण व शहरी भागात आशा व गट प्रवर्तकांची प्राथमिक आरोग्य केंद्र, लसीकरण केंद्र व क्वारंटाइन कॅम्प येथे ८ तासांची ड्युटी लावण्यात आली आहे. काही ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रात येऊन आशांना कोरोनासदृश रुग्णांची अँटिजन टेस्ट करावी लागते. दैनंदिन लसीकरणाच्या आढाव्यापासून शासनाच्या सर्व योजनांचा तसेच आशांनी केलेल्या सर्व्हेच्या कामाचा दैनंदिन आढावा गट प्रवर्तकांना वरिष्ठांना सादर करावा लागतो. आपल्या घरातील जबाबदाऱ्या सांभाळून आठवड्यातून काही दिवस काम करण्याचे त्यांच्या सेवा शर्तीमध्ये नमूद असूनही त्यांना रविवारसह आठवड्यातील सातही दिवस सुमारे आठ तास काम करावे लागते. तसेच त्यांच्याकडून हे काम विनामोबदला करवून घेण्यात येते. आशा स्वयंसेविका, गट प्रवर्तकांची परिस्थिती वेठबिगारांसारखी झाली आहे. कोणाकडूनही विनामूल्य काम करवून घेणे, यामुळे घटनात्मक तरतुदींचा भंग होतो. या पार्श्वभूमीवर आंदोलनाचे हत्यार उपसण्यात आल्याचे या निवेदनात म्हटले आहे.
यापूर्वी राज्य शासनाकडे निवेदने दिली असूनही त्यांची दखल, घेतली नसल्याने एक दिवसीय राज्यव्यापी लाक्षणिक संप पुकारण्यात आला आहे. या संपाचे निवेदन आरोग्य केंद्र वावी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. छाया राशिनकर यांना एकदिवसीय संपाचे निवेदन आशा गटप्रवर्तक आशा शेळके, सारिका घेगडमल, आशा सेविका हेमलता बोरसे, हेमलता कासार, वंदना बैरागी, वैशाली पठाडे, वैशाली रणधीर, प्रमिला वेळजाळी यांनी दिले.
फोटो ओळी- आशा स्वयंसेविका आंदोलनाच्या पवित्र्यात असून, विविध मागण्यांचे निवेदन वावी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. छाया राशिनकर यांना देण्यात आले. (१० सिन्नर २)
===Photopath===
100621\10nsk_27_10062021_13.jpg
===Caption===
१० सिन्नर २