सफाई कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात
By admin | Published: November 27, 2015 11:22 PM2015-11-27T23:22:33+5:302015-11-27T23:23:27+5:30
पोलीस आयुक्तालय : सेवेत घेण्याची मागणी
नाशिक : पोलीस आयुक्तालय व इतर ६० एकर परिसराची गत २० वर्षांपासून सफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घ्यावे या मागणीसाठी आंदोलन केले जाणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली़ या कर्मचाऱ्यांना नियुक्तिपत्रे दिलेली असताना त्यांना वगळून नव्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचा पोलीस प्रशासनाचा डाव असल्याचा आरोपही यावेळी कर्मचाऱ्यांनी केला आहे़
पोलीस आयुक्तालय, मुख्यालय, शासकीय बंगले, मैदाने अशा सुमारे ६० एकर परिसराची सफाई करण्याचे काम सुनील जॉनी खोकरे, सुमनबाई पी. जाधव, मंदाबाई शिवाजी वाघमारे, शोभा धनंजय खरे, जयश्री साहेबराव पाठक, कलाबाई पंडित शेंडगे यांच्यासह ३३ कर्मचारी गत २० वर्षांपासून करीत आहेत़ या कर्मचाऱ्यांना केवळ १२०० रुपये मासिक वेतन दिले जात असून, पोलीस प्रशासनाने त्यांना सफाई कामगार म्हणून नियुक्तिपत्रही दिले आहे़
गत २० वर्षांपासून काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांचे वय झाल्यामुळे त्यांना कामावरून कमी करून त्यांच्या जागेवर नवीन सफाई कर्मचारी नियुक्त करण्याचा पोलीस प्रशासनाचा डाव असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी न करता नव्याने होणाऱ्या भरतीमध्ये या कर्मचाऱ्यांच्या मुलांना प्राधान्य देण्याची मागणीही या कर्मचाऱ्यांनी केली आहे़ याबाबत निर्णय न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे़ (प्रतिनिधी)