शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात
By admin | Published: November 5, 2016 01:21 AM2016-11-05T01:21:13+5:302016-11-05T01:41:40+5:30
पीककर्ज : मागण्यांबाबत शासन उदासीन
नाशिक : द्राक्षबागांसाठी जिल्हा बॅँकेकडून पीककर्ज न मिळालेल्या शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत शासन व प्रशासकीय पातळीवरही उदासीनतेचेच प्रदर्शन घडल्यामुळे नाशिक दौऱ्यावर येत असलेले केंद्रीय भूपृष्ठमंत्री नितीन गडकरी यांच्यासमोर आंदोलन करण्याचा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे.
या संदर्भात गेल्या दोन दिवसांपासून गुप्त बैठकांना जोर आला असून, गडकरी यांच्या उपस्थितीत शहरात तीन ठिकाणी कार्यक्रम होणार असल्याने त्यापैकी कोणत्याही एका ठिकाणी हे आंदोलन केले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
जिल्ह्यातील नाशिक, निफाड व दिंडोरी या तीन तालुक्यांतील सुमारे एक लाख शेतकऱ्यांचे पीककर्ज मंजूर करूनही ते देण्यास जिल्हा बॅँकेने असमर्थता व्यक्त केल्याने शेतकरी ऐन द्राक्षाच्या हंगामात अडचणीत सापडले आहेत. या संदर्भात जिल्हा बॅँकेच्या सर्वसाधारण सभेतही प्रश्न उपस्थित करून संचालकांचे लक्ष वेधण्यात आले, त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्याही कानी तक्रार टाकण्यात आली. पालकमंत्री गिरीश महाजन, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याकडेही पाठपुरावा करण्यात आला, परंतु आश्वासना पलीकडे शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागले नाही.
गेल्या आठवड्यात शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण आंदोलन केले. त्यावेळी झालेल्या चर्चेत जिल्हाधिकाऱ्यांनी दोनशे कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याचे आश्वासन दिले, तथापि, जिल्ह्णात नगरपालिकांच्या निवडणुकीची आचारसंहिता जारी झाल्याने आता प्रशासनानेही त्यातून अंग काढून घेतले आहे. (प्रतिनिधी)