वाळू माफियांचा पोलीस पाटलांवर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 07:16 PM2021-03-21T19:16:01+5:302021-03-21T19:16:54+5:30
सटाणा : बागलाण तालुक्यातील केरसाणे येथील कान्हेरी नदीत विट भट्टीसाठी लागणाऱ्या घेसूच्या नावाखाली अवैधरीत्या वाळू उपसा करणाऱ्यांकडून झालेल्या दगडफेकीत पोलिस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष गंभीर जखमी झाले असून त्यांना मालेगाव सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कान्हेरी नदीवर रविवारी (दि.२१) सकाळच्या सुमारास अवैधरीत्या वाळू उपसा होत असल्याची माहिती सरपंच फुलाबाई माळी, उपसरपंच विमलबाई मोरे यांनी गावचे पोलिस पाटील भाऊसाहेब मोरे व तंटामुक्तीचे अध्यक्ष संजय आहीरे यांना देताच पोलिस पाटील व तंटामुक्तीचे अध्यक्ष यांनी कान्हेरी नदीकडे धाव घेतली.
यावेळी वाळू उपसा करणाऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून दगडफेक करण्यात आली. यात पोलिस पाटील व तंटामुक्तीचे अध्यक्ष दोघेही जखमी झाले आहेत. त्यांना प्रथम सटाणा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले तेथून त्यांना मालेगाव सामान्य रुग्णालयात अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी सटाणा पोलिस स्टेशनमध्ये अद्यापपर्यत गुन्हा दाखल नसल्याचे सांगण्यात आले .
गावोगावी वाळू तस्करांची दादागिरी वाढली असून त्यांना अटकाव करण्यासाठी गावाचे पोलिस पाटील तंटामुक्ती अध्यक्ष सरपंच व ग्रामपंचायतीचे सदस्य प्रयत्न करतात. मात्र वाळू तस्करांकडून प्रति उत्तर देण्यासाठी दगडफेक, अंगावर ट्रॅक्टर घालणे आदी प्रकार वाढले आहेत. महसूल प्रशासाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
- किशोर सूर्यवंशी, तालुका अध्यक्ष, पोलिस पाटील संघटना, बागलाण.
(२१ सटाणा)