संत निवृत्तीनाथांच्या समाधीला चंदनाचा लेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2022 01:45 AM2022-04-27T01:45:43+5:302022-04-27T01:46:08+5:30
त्र्यंबकेश्वर येथे वरुथिनी एकादशीच्या दिवशी संत श्री निवृत्तीनाथांच्या समाधीला शीतल, सुवासिक चंदनाच्या उटीचा लेप करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी हरिनामाचा जयघोष, टाळ-मृदुंगाचा गजर केला.
त्र्यंबकेश्वर : येथे वरुथिनी एकादशीच्या दिवशी संत श्री निवृत्तीनाथांच्या समाधीला शीतल, सुवासिक चंदनाच्या उटीचा लेप करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी हरिनामाचा जयघोष, टाळ-मृदुंगाचा गजर केला.
परंपरेप्रमाणे येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. त्या अंतर्गत ७ दिवस अनेक महिलांनी ओवी, अभंग गात उटी तयार केली. मंगळवारी (दि. २६) संत निवृत्तीनाथांच्या समाधीची पंचोपचारे पूजा व अभिषेक झाल्यावर, दुपारी २ वाजता टाळ-मृदुंगाच्या साथीने अभंग गात संजीवन समाधी व इतर देवतांना उटी लावण्यास प्रारंभ करण्यात आला. यावेळी संस्थान प्रशासकीय समितीचे पदाधिकारी ॲड.भाऊसाहेब गंभीरे, जयंत गोसावी, योगेश गोसावी, बंडातात्या कऱ्हाडकर, महामंडलेश्वर डॉ.रामकृष्ण महाराज लहवितकर, सुरेश गोसावी, भानुदास गोसावी, गोविंद गोसावी, सच्चिदानंद गोसावी, ॲड.विजय धारणे आदी मान्यवर उपस्थित होते. श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे वारकरी संप्रदायाचे आद्य प्रवर्तक श्रीसंत निवृत्तीनाथ महाराजांच्या संजीवन समाधी व गर्भगृहातील अन्य देवतांच्या मूर्तींना सुगंधी चंदनाची उटी लावण्यात आली.
जवळपास पन्नास हजारांच्या वर भाविकांनी येथे हजेरी लावली. रात्री ११ वाजता समाधीची विधीवत पूजा करून देवतांना लावलेली उटी उतरविण्यात येऊन ती भाविकांना प्रसाद म्हणून वाटण्यात आली.
इन्फो
भूतलावरील सजीव सृष्टीप्रमाणे देवालाही वैशाखाचा दाह सुसह्य व्हावा, या भावनेतून चैत्र वद्य एकादशीला श्रीसंत निवृत्तीनाथ महाराजांची संजीवन समाधी व मंदिराच्या गर्भगृहातील विठ्ठल-रुक्मिणी, आदिशक्ती मुक्ताबाई यांच्या मूर्तीला चंदनाच्या उटीचे लेपन करण्यात येते. सुमारे दीडशे वर्षांपूर्वी एका वारकरी महिलेने सुरू केलेली ही परंपरा अखंड सुरू आहे.