सांदण दरीची वाट ५ महिन्यांसाठी बंद; कळसुबाई अभयारण्यात वन्यजीव विभागाने घातले निर्बंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2022 08:08 PM2022-07-11T20:08:03+5:302022-07-11T20:46:35+5:30

पावसाळी पर्यटन

Sandan valley closed for 5 months; Restrictions imposed by Wildlife Department in Kalsubai Sanctuary | सांदण दरीची वाट ५ महिन्यांसाठी बंद; कळसुबाई अभयारण्यात वन्यजीव विभागाने घातले निर्बंध

सांदण दरीची वाट ५ महिन्यांसाठी बंद; कळसुबाई अभयारण्यात वन्यजीव विभागाने घातले निर्बंध

googlenewsNext

- अझहर शेख

नाशिक : कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यातील साम्रद गावाजवळील आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी सांदण दरीचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून नाशिक वन्यजीव विभागाने घोषित केला आहे. 

मागील चार दिवसांपासून भंडारदरा व अभयारण्याच्या परिसरात मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेता सांदण’वाट पर्यटकांकरिता आता थेट नोव्हेंबरपर्यंत बंद करण्यात आली आहे. तसेच अभयारण्यातील गड, किल्ले व धरणाच्या परिसरात रात्रीच्या मुक्कामावर आता बंदी घातली गेली आहे.

नाशिक वन्यजीव विभागाच्या अखत्यारितित असलेल्या कळसुबाई हरिश्चंद्र गड अभयारण्यात सध्या अतीमुसळधार पाऊस सुरु आहे. नाशिक, मुंबई, पुणे, अहमदनगर या भागातून मोठ्या प्रमाणात पर्यटक अभयारण्यात वर्षा सहलीसाठी दाखल होतात. मागील दोन वर्षांपासून कोराेनाच्या लाटेमुळे वर्षा सहलींवर निर्बंध होते. 

यावर्षी पर्यटकांचा ओघ मोठ्या प्रमाणात वाढण्याची श्यक्यता लक्षात घेता वन्यजीव विभागाने निर्बंध घातले आहेत. साम्रद गावाजवळ असलेली सांदण दरी पर्यटकांसाठी येत्या नोव्हेंबर महिन्यापर्यंत बंद राहणार असल्याचे सहायक वनसंरक्षक गणेश रणदिवे यांनी सांगितले.

अभयारण्याच्या परिसरात नैसर्गिक धबधब्यांचा आनंद लुटताना वन्यजीव विभागाने जे धबधबे सुरक्षित केले आहेत, व त्याच्या वाटा निश्चित केलेल्या आहेत, त्याच भागात पर्यटकांनी जावे, वेगळी वाट ‘धोक्याची’ ठरू शकते, हे लक्षात घ्यावे. जंगलाचा परिसर आणि धो-धो कोसळणारा पाऊस, निसरड्या वाटा, वाढलेले रानगवत यामुळे दुर्घटना घडू शकते. यामुळे वन्यजीव विभागाच्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

अभयारण्याच्या परिसरात कुठल्याहीप्रकारचे बेभान व बीभत्स असे वर्तन खपवून घेतले जाणार नसल्याचा इशारा वन्यजीव विभागाने दिला आहे. वर्षा पर्यटनासाठी येताना कोणीही मद्यप्राशनाचा बेत आखू नये, कारण अभयारण्याच्या तपासणी नाक्यांवर तसेच पेट्रोलिंगदरम्यान तपासणी करताना मद्याच्या बाटल्या आढळून आल्यास वन्यजीव कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे रणदिवे यांनी सांगितले.

Web Title: Sandan valley closed for 5 months; Restrictions imposed by Wildlife Department in Kalsubai Sanctuary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.