संदीप वाजे काही बोलेना....!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2022 01:36 AM2022-02-16T01:36:12+5:302022-02-16T01:40:25+5:30
आज पोलीस करणार न्यायालयात उभे नाशिक : मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा वाजे हत्याकांडातील मुख्य संशयित त्यांचे पती संदीप ...
आज पोलीस करणार न्यायालयात उभे
नाशिक : मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा वाजे हत्याकांडातील मुख्य संशयित त्यांचे पती संदीप वाजे यांच्याकडून पोलिसांना कोठडीत फारसे सहकार्य मिळत नसल्याने वाढीव कोठडीची मुदत संपूनदेखील अजून कोणत्याही संशयिताला अटक करण्यास यश आलेले नाही. बुधवारी (दि.१५) वाजे यास पोलिसांकडून इगतपुरी न्यायालयात उभे केले जाणार आहे.
पोलिसांनी मुख्य संशयित म्हणून संदीप वाजे यास बेड्या ठोकल्या. गुन्ह्याचे गांभीर्य व तीव्रता लक्षात घेत या प्रकरणात एकूण १३ दिवस संदीप वाजेला पोलीस कोठडी दिली. वाजे याने पोलीस कोठडीत पोलिसांना गुन्ह्याशी संबंधित फारशी माहिती न दिल्यामुळे तसेच खुनाच्या कटात सूत्रधार असल्याची कबुलीदेखील दिलेली नाही. यामुळे तपासाला पुढे गती मिळू शकलेली नाही. तसेच त्याने सुवर्णा वाजे यांचा काटा काढण्यासाठी आणखी कितीजणांची मदत घेतली हेदेखील निष्पन्न झालेले नाही. सुवर्णा वाजे यांना पार्टीच्या बहाण्याने शहराबाहेर हायवेलगत बोलावून घेत खून करून त्यांच्या कारसह मृतदेह पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने पेटवून दिल्याचे पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासातून पुढे आले आहे. संदीप वाजे याच्या मोटारीत भला माेठा चाकूदेखील पोलिसांना आढळून आला आहे. दुसरे लग्न करण्यावरून वाजे दाम्पत्यांमध्ये कलह सुरू होता. हा कलह पराकोटीला पोहोचून घटस्फोटाचे प्रकरण न्यायालयातदेखील पोहोचले होते. सुवर्णा वाजे यांनी विभक्त होण्यासाठी पती संदीप वाजेकडे ३०लाखांची मागणीदेखील केली होती, असेही पोलिसांच्या हाती लागलेल्या त्यांच्या चिठ्ठीवरून पुढे आले आहे.
दरम्यान, संदीप वाजे यास न्यायालयाने आतापर्यंत टप्प्याटप्प्याने दोनदा पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांचा तपास मोबाइलमधील संवाद, डॉ. वाजे यांनी लिहलेली चिठ्ठी, नातेवाईक व मित्रांचे जाबजबाब यांच्याभोवतीच फिरत आहे.
--इन्फो--
न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष!
वाजे हत्याकांडाच्या तपासाला गती मिळालेली नाही. संशयित संदीप वाजे याने गुन्ह्याची कबुली दिलेली नाही किंवा या गुन्ह्यात त्याने अजून कोणाकोणाची मदत घेतली हेदेखील पोलिसांना सांगितलेले नाही. यामुळे गुन्ह्यात आणखी काही संशयित अजूनही निष्पन्न होऊ शकलेले नाहीत. यामुळे बुधवारी ग्रामीण पोलीसांकडून न्यायालयात काय बाजू मांडली जाते व सुनावणीनंतर न्यायालयाकडून काय निर्णय दिला जातो? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.