संदीप वाजेने दुसऱ्या लग्नासाठी काढला पत्नीचा काटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2022 01:40 AM2022-02-12T01:40:49+5:302022-02-12T01:41:11+5:30
डॉ. सुवर्णा वाजे खून प्रकरणात अटक संदीप वाजेच्या गाडीतून सुमारे साडेदहा इंचाच्या चाकूसह मोबाइलमधील डिलीट केेलेले काही मेसेजेस, एक व्हिडिओ आणि एक पत्र पोलिसांच्या हाती लागले आहे. त्यातून वाजे याने दुसऱ्या लग्नासाठी डॉ. सुवर्णा वाजे यांचा खून केल्याचे दिसत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून, त्याआधारे पोलिसांनी अधिक तपासासाठी न्यायालयात बुधवारपर्यंत (दि.१६) वाढवून मागितलेली संदीप वाजेची पोलीस कोठडी न्यायालयाने शुक्रवारी मंजूर केली आहे.
नाशिक : डॉ. सुवर्णा वाजे खून प्रकरणात अटक संदीप वाजेच्या गाडीतून सुमारे साडेदहा इंचाच्या चाकूसह मोबाइलमधील डिलीट केेलेले काही मेसेजेस, एक व्हिडिओ आणि एक पत्र पोलिसांच्या हाती लागले आहे. त्यातून वाजे याने दुसऱ्या लग्नासाठी डॉ. सुवर्णा वाजे यांचा खून केल्याचे दिसत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून, त्याआधारे पोलिसांनी अधिक तपासासाठी न्यायालयात बुधवारपर्यंत (दि.१६) वाढवून मागितलेली संदीप वाजेची पोलीस कोठडी न्यायालयाने शुक्रवारी मंजूर केली आहे.
नाशिक शहरासह संपूर्ण जिल्ह्याला हादरून टाकलेल्या डॉ. सुवर्णा वाजे हत्या प्रकरणात प्रमुख संशयित आरोपी संदीप वाजे याची सात दिवसांची पोलीस कोठडी संपल्याने पोलिसांनी त्याला शुक्रवारी (दि.११) न्यायालयासमोर हजर करीत वाजे तपासात सहकार्य करीत नसल्याचे सांगत पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी केली. त्यासाठी पोलिसांनी वाजे याच्या गाडीतून सुमारे साडेदहा इंचाचा मोठा चाकू आढळून आल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देतानाच वाजेचा चाकू सोबत बाळगण्याचा काय उद्देश होता, त्याने तो कोठून आणला, याविषयी तपास करण्याचे कारण देतानाच मयत डॉ. सुवर्णा वाजे यांनी आरोपितास घटनेपूर्वी केलेले मॅसेज त्याने डिलीट केल्याचेही नमूद केले. त्यातील एक व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागला असून, त्यात संशयिताने डॉ. सुवर्णा वाजे यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या शब्दांचा प्रयोग केल्याचे समोर आले आहे. यात एकाचाही समावेश असून, आरोपीला दुसरे लग्न करण्यासाठी पत्नी डॉ. सुवर्णा वाजेचा अडथळा होत असल्याने हा अडथळा दूर करण्यासाठी आरोपी पत्नीला त्रास देत होता. त्यामुळे डॉ. सुवर्णा वाजे यांनी मुलाच्या भविष्यासाठी आरोपीकडे ३० लाख रुपयांची मागणी केल्याने दोघांमध्ये भांडणही झाले होते. संदीप वाजे याने डॉ. सुवर्णा वाजे यांना संपविण्यासाठी हे महत्त्वाचे कारण असल्याचा पोलिसांचा अंदाज असून, ही बाब पोलिसांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर न्यायालनाने संदीप वाजेची पोलीस कोठडीत रवानगी केल्याची माहिती सरकारी वकील जयदेव रिके यांनी दिली.