संगमेश्वर : चार दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन सावता महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 10:57 PM2018-02-09T22:57:16+5:302018-02-10T00:32:49+5:30
संगमेश्वर : श्री संत सावता महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची येथे जोरदार तयारी सुरू असून, येत्या १६ फेब्रुवारीपासून चार दिवसीय विविध धार्मिक कार्यक्रमांचे त्यानिमित्ताने आयोजन करण्यात आले आहे.
संगमेश्वर : श्री संत सावता महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची येथे जोरदार तयारी सुरू असून, येत्या १६ फेब्रुवारीपासून चार दिवसीय विविध धार्मिक कार्यक्रमांचे त्यानिमित्ताने आयोजन करण्यात आले आहे. येथील सावता चौकातील संत सावता महाराज मंदिरात १९४४ साली सावता महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाली होती. कालांतराने या मूर्तीसोबतच श्री विठ्ठल रुक्मिणी आदींच्या मूर्तीही जीर्ण झाल्याने नवीन मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचा निर्णय मंदिराच्या विश्वस्तांनी घेतला. त्यानुसार गेल्या वर्षभरापूर्वीच राजस्थानमधील कुशल मूर्तिकाराकडून नवीन मूर्ती घडविण्यात आल्या आहेत. या मूर्तींच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे गेल्या महिनाभरापासून नियोजन करण्यात आले आहे. परिसरातील भविकांकडून देणगीद्वारे निधी उभा करण्यात आला आहे. सुमारे साडेतीन फूट उंचीची सावता महाराजांची व सुमारे अडीच फूट उंचीची विठ्ठल रुक्मिणीची विटेवर उभी असलेली मूर्ती घडविण्यात आली आहे. या नवीन मूर्तींच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास येत्या १६ फ्रेबुवारी रोजी शोभायात्रेने प्रारंभ होणार आहे. नवीन मूर्तीची परिसरातून वाजतगाजत मिरवणूक सकाळी ९ वाजता निघणार आहे. श्री महंत कमलपुरीजी महाराज यांच्या हस्ते नूतन ूमूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होईल. नवग्रह होम, अभिषेक, प्राणप्रतिष्ठा पूजन व सायंकाळी आरती आदी कार्यक्रम होतील. दि. १७ रोजी दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम व सायंकाळी आरती, दि. १८ फेब्रुवारी रोजी स्थापित देवता पूजन आदि कार्यक्रम होतील. दि. १९ फेब्रुवारी रोजी रात्री ९ ते ११ कीर्तन व सकाळी १० ते १२ हभप कैकाडी महाराजांचे पुतणे व हभप रामदास महाराज जाधव (मठाधिपती पंढरपूर) यांचे काल्याचे कीर्तन, महाआरती व महाप्रसादाने चार दिवसीय सोहळ्याची सांगता होणार आहे. मंदिर परिसरात मंडप उभारण्यात येत आहे. मंदिर व परिसरात विद्युत रोषणाई करण्यात येत आहे.