किशोरवयीन मुलींसाठी सॅनिटरी नॅपकिन
By admin | Published: December 2, 2015 11:06 PM2015-12-02T23:06:49+5:302015-12-02T23:09:11+5:30
विजयश्री चुंभळे : प्रकल्प राज्यभर राबविणार
नाशिक : जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीने येथील शासकीय कन्याशाळेत किशोरवयीन मुलींना मोफत सॅनिटरी नॅपकिन पुरविण्याची संकल्पना आता राज्यभरात राबविण्यात येणार असून तसेच आदेश ग्रामविकास विभागाने राज्यातील सर्वच जिल्हा परिषदांना दिले आहेत.
जिल्हा परिषद अध्यक्ष विजयश्री चुंभळे यांनी याबाबत शासन स्तरावर पाठपुरावा केला होता, त्यास यश आले आहे. मागील महिन्यात जिल्हा परिषदेच्या शासकीय कन्याशाळेत किशोरवयीन मुलींना मोफत सॅनिटरी नॅपकिन पुरविण्याच्या योजनेचा शुभारंभ ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते करण्यात आला होता. त्यावेळी पंकजा मुंडे यांनी या योजनेचे कौतुक करतानाच ही योजना राज्यभर राबविण्याचे सूतोवाच केले होते. त्याअनुषंगाने आता ३० नोव्हेंबरला ग्रामविकास विभागाच्या एका निर्णयानुसार आता राज्यभरातील महिला व बालकल्याण समितीने राबविण्याच्या योजनेमध्ये जनजागृती करून ‘सॅनिटरी नॅपकिन’ उपलब्ध करून देण्याबाबतच्या बाबींचा समावेश करावा, असे राज्यभरातील सर्व जिल्हा परिषदांना कळविले आहे. नाशिकची योजना राज्यासाठी पथदर्शी प्रकल्प ठरली असून या योजनेमुळे किशोरवयीन मुलींमध्ये जनजागृती होऊन त्यांना आरोग्य विषयक काळजी घेता येईल,असे विजयश्री चुंभळे यांनी सांगितले आहे. (प्रतिनिधी)