गोदा प्रदूषण टाळण्यासाठी चाळीस गावांचा स्वच्छता आराखडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:45 AM2021-01-08T04:45:14+5:302021-01-08T04:45:14+5:30
गोदावरी प्रदूषण नियंत्रण उच्चाधिकार समितीची बैठक गुरुवारी (दि. ७) विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीव्दारे घेण्यात आली. ...
गोदावरी प्रदूषण नियंत्रण उच्चाधिकार समितीची बैठक गुरुवारी (दि. ७) विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीव्दारे घेण्यात आली. यावेळी गमे यांनी आदेश दिले आहेत.
जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या गोदावरी नदीकाठावरील प्रदूषण समितीतील चाळीस गावांचा समावेश वसुंधरा अभियानांतर्गत करावा तसेच पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीचा वापर या गावांतील सांडपाणी नियोजन करण्यासाठी करण्याचे आदेश ही गमे यांनी केले, तर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी चाळीस गावांमधील स्वच्छता कामांचा कृती आराखडा तयार करण्यात येत असून, तो महिना अखेरीस पूर्ण होईल, असे सांगितले.
बैठकीस विभागीय उपआयुक्त दत्तात्रेय बेारूडे, नगररचना विभागाच्या सहायक संचालक प्रतिभा भदाणे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महापालिका आयुक्त कैलास जाधव, स्मार्ट सिटीचे सीईओ प्रकाश थविल, याचिकाकर्ते राजेश पंडित व निशिकांत पगारे तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते.
इन्फो...
औद्योगिक क्षेत्रातून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी निरी व महाराष्ट्र औद्याेगिक विकास महामंडळ यांची एकत्रित बैठक महापालिकेने घ्यावी तसेच गोदावरी प्रदूषण टाळण्यासाठी महापालिका आयुक्तांनी बैठक घ्यावी, असे आदेश राधाकृष्ण गमे यांनी दिले. त्याचबरोबर प्रदूषण टाळण्यासाठी पोलीस यंत्रणेने उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे, अशी सूचनाही त्यांनी केली.