नाशिक शहरातील सफाई कामगारांना कचरा उचलण्यासाठी ७४५ हातगाडे खरेदीस मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 06:14 PM2018-01-11T18:14:04+5:302018-01-11T18:15:34+5:30
कचरा संकलन : सुमारे एक कोटी रुपये खरेदीचा प्रस्ताव
नाशिक : दोन वर्षांपूर्वी सिंहस्थ कुंभमेळ्यात सफाई कामगारांना कचरा संकलनासाठी ६०० तिचाकी-चारचाकी हातगाड्यांची खरेदी केल्यानंतर महापालिकेच्या आरोग्य व गोदावरी संवर्धन कक्षाने पुन्हा एकदा ७४५ हातगाडे खरेदीचा प्रस्ताव तयार केला आहे. सुमारे एक कोटी रुपये खर्चाच्या या प्रस्तावास बुधवारी (दि.१०) झालेल्या महासभेत मंजुरी देण्यात आली.
महापालिकेने गोदावरी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी खास गोदावरी संवर्धन कक्ष स्थापन केला असून, या कक्षामार्फत गोदाघाटावर खासगी सुरक्षारक्षक नेमण्यात आलेले आहेत. मात्र, गोदाघाटावर रोज शेकडोच्या संख्येने येणा-या भाविकांसह पर्यटकांमार्फत केरकचरा, प्लॅस्टिक पिशव्या, वस्त्रे तेथेच टाकून दिली जातात. महापालिकेने गोदाघाट स्वच्छतेसाठी सफाई कामगारांच्याही नेमणुका केलेल्या आहेत. मात्र, याठिकाणी सफाई कामगारांना कचरा उचलण्यासाठी, संकलित करण्यासाठी हातगाड्यांची व्यवस्था नाही. त्यासाठी गोदावरी संवर्धन कक्षाने गोदाघाटावर १४५ तीनचाकी हातगाड्यांची मागणी केली आहे. याशिवाय, महापालिकेच्या आरोग्य विभागाकडेही सद्यस्थितीत ६०० हातगाडे आहेत. दोन वर्षांपूर्वी झालेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यात महापालिकेने या हातगाड्यांची खरेदी केली होती. मात्र, सदर हातगाडे हे पंचवटी आणि काही भागातच आहेत. शहरातील उर्वरित भागातही सफाई कामगारांना केरकचरा संकलनासाठी हातगाड्या उपलब्ध करून देण्याची मागणी वाढल्याने आरोग्य विभागाने पुन्हा ७४५ तिचाकी व चारचाकी हातगाडे खरेदीचा प्रस्ताव तयार केला होता. सदरचा प्रस्ताव बुधवारी झालेल्या महासभेत मंजूर करण्यात आल्याने हातगाडे खरेदीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानुसार, ४४५ तीनचाकी हातगाडे १० हजार ४५० रुपये प्रतिनगाप्रमाणे तर ३०० चारचाकी हातगाडे १७ हजार ९५० रुपये प्रतिनग दराने खरेदी करण्याचा प्रस्ताव आहे.
कामगार संख्या मात्र अपुरी
महापालिकेकडे १९९३ सफाई कामगारांची पदे मंजूर आहेत. त्यातील ५७ पदे रिक्त आहेत तर २७८ कामगार हे विविध विभागात कार्यरत आहेत. शहराच्या वाढत्या विस्तारानुसार सफाई कामगारांची संख्या अपुरी आहे. सुमारे १३०० त १३५० कामगार कार्यरत असतात. मात्र, कामगारांची संख्या अपुरी असताना प्रतिदोन सफाई कामगारामागे एक हातगाडी खरेदीचा प्रस्ताव मात्र आरोग्य विभागाने तयार केला आहे. सद्यस्थितीत आऊटसोर्सिंगद्वारे ७०० सफाई कामगार भरतीचा प्रस्ताव महासभेवर प्रलंबित आहे.