सॅनिटायझरच्या खपात दहापटीने वाढ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 12:27 AM2020-03-16T00:27:45+5:302020-03-16T00:28:12+5:30
कोरोनाच्या धसक्याने धास्तावलेल्या नागरिकांकडून सॅनिटायझरची तुफान खरेदी केली जात आहे. ज्या मेडिकलच्या दुकानांतून महिन्याला तीन-चार सॅनिटायझरची विक्री व्हायची तिथून आता महिनाभरात चाळीस-पन्नास सॅनिटायझर, तर ज्या दुकानांतून महिन्याला शे-दीडशे सॅनिटायझर जायचे, त्या दुकानांमधून दिवसाला शे-दीडशे बॉटल्सचा खप होत आहे. त्यामुळे कोरोनाने या सॅनिटायझर्सचीच सर्वाधिक चांदी झाली आहे.
नाशिक : कोरोनाच्या धसक्याने धास्तावलेल्या नागरिकांकडून सॅनिटायझरची तुफान खरेदी केली जात आहे. ज्या मेडिकलच्या दुकानांतून महिन्याला तीन-चार सॅनिटायझरची विक्री व्हायची तिथून आता महिनाभरात चाळीस-पन्नास सॅनिटायझर, तर ज्या दुकानांतून महिन्याला शे-दीडशे सॅनिटायझर जायचे, त्या दुकानांमधून दिवसाला शे-दीडशे बॉटल्सचा खप होत आहे. त्यामुळे कोरोनाने या सॅनिटायझर्सचीच सर्वाधिक चांदी झाली आहे.
सॅनिटायझर जे एकेकाळी केवळ लक्झरी कारधारक आणि मोठमोठ्या कॉर्पोरेट कार्यालयांचीच मक्तेदारी गणली जात होती. त्यामुळे त्यांची विक्रीदेखील खूप मर्यादित होती. त्या परिस्थितीत सॅनिटायझर हा शब्ददेखील सामान्य नागरिकांना फारसा परिचित नव्हता. मात्र, गत दोन महिन्यांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावाची दहशत वाढू लागल्यापासून खबरदारीचा उपाय म्हणून सॅनिटायझरच्या विक्रीत वाढ होऊ लागली. मात्र, फेब्रुवारीच्या मध्यापासून सॅनिटायझरचा खप प्रचंड प्रमाणात वाढण्यास प्रारंभ झाला. हे प्रमाण अल्पावधीत दहा पटीपेक्षाही अधिक वाढल्याचे मेडिकल व्यावसायिकांनी सांगितले. त्यातही गत दोन आठवड्यांमध्ये हे प्रमाण सर्वाधिक वाढले आहे.
सॅनिटायझर जीवनावश्यक यादीत
करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने मास्क आणि सॅनिटायझर अत्यावश्यक वस्तूंमध्ये समावेश केला आहे. त्यामुळे मास्क आणि सॅनिटायझरचा काळाबाजार आणि साठेबाजी करणाऱ्यांवर आळा घालण्याचा प्रयत्न आहे. ग्राहक संरक्षण आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने यासंदर्भात आदेश जारी केला आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांकडून वेगवेगळ्या पातळीवर उपाययोजना करण्यात येत आहेत. यानंतर केंद्र सरकारने मास्क आणि सॅनिटायझरचा काळा बाजार आणि साठेबाजी रोखण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. मास्क आणि सॅनिटायझरचा केंद्र सरकारने अत्यावश्यक वस्तूंमध्ये समावेश केला आहे. यात सर्जिकल मास्क, एन ९५ मास्कचा समावेश असेल. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तात्पुरता हा निर्णय घेण्यात आला असून, शासनाचा हा आदेश ३० जूनपर्यंत लागू राहणार आहे.