सॅनिटायझरने संगणकाचा मजकूर होतो करप्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2020 01:01 AM2020-10-19T01:01:10+5:302020-10-19T01:01:42+5:30
कोरोनाच्या दहशतीमुळे अनेक नागरिक वापरातील बहुतांश वस्तूंवर सॅनिटायझर फवारणी केल्यानंतरच त्याचा वापर करतात. अगदी कार्यालयातही प्रत्येक वस्तूचा वापर हा सॅनिटाइज केल्यानंतरच करण्याकडे अनेकांचा कल असतो. मात्र, अन्य कोणत्याही वस्तूंना सॅनिटाइज केले तरी चालेल, मात्र शासकीय कार्यालयांमधील संगणक स्क्रीन तसेच यूपीएसवर सॅनिटाइजरची फवारणी करू नये, असे परिपत्रकच शासनाने काढले आहे.
नाशिक : कोरोनाच्या दहशतीमुळे अनेक नागरिक वापरातील बहुतांश वस्तूंवर सॅनिटायझर फवारणी केल्यानंतरच त्याचा वापर करतात. अगदी कार्यालयातही प्रत्येक वस्तूचा वापर हा सॅनिटाइज केल्यानंतरच करण्याकडे अनेकांचा कल असतो. मात्र, अन्य कोणत्याही वस्तूंना सॅनिटाइज केले तरी चालेल, मात्र शासकीय कार्यालयांमधील संगणक स्क्रीन तसेच यूपीएसवर सॅनिटाइजरची फवारणी करू नये, असे परिपत्रकच शासनाने काढले आहे.
कोरोनाचा फैलाव होऊ नये, यासाठी शासनाकडून एकामागोमाग एक विविध पर्यायांचा अवलंब केला जात आहे. रोगाचा फैलाव टाळण्यासाठी सर्वत्र आणि सर्व स्तरावर सॅनिटायझरचा प्रचंड वापर केला जात आहे. बहुतांश नागरिक स्वत:च्या सुरक्षिततेसाठी सॅनिटायझरची एखादी तरी बाटली स्वत:जवळ ठेवतात. तसेच कार्यालयात गेल्यावर अनेक जण आपल्या बसण्याची खुर्ची, टेबल आणि त्या परिघातील प्रत्येक वस्तू सॅनिटाइज करतात किंवा कुणी अपरिचित व्यक्ती येऊन भेटून गेला, तरी काळजीपोटी सॅनिटायजरची फवारणी केली जाते. कार्यालयातही एखादा रुग्ण आढळल्यास संबंधित शासकीय कार्यालयात रोगप्रतिबंधात्मक औषधांची फवारणी करण्यात येते. त्यावेळी काही कर्मचारी सुरक्षात्मक उपाययोजना म्हणून संगणकाच्या मॉनिटरवर सॅनिटायझर फवारणी करतात. मात्र, यासंदर्भात अनेक कार्यालयांमध्ये असे निदर्शनास आले आहे की फवारणी करताना संगणकाच्या मॉनिटर डिस्प्लेच्या आत सॅनिटायझरचा अंश गेल्यास डिस्प्ले खराब होतो. त्यामुळे काही शासकीय विभागातील संगणकच बंद पडल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे शासकीय, निमशासकीय कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांना शासकीय परिपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे की रोगप्रतिबंधात्मक औषधे, सॅनिटायझरची फवारणी करताना ते कोणत्याही संगणकावर पडणार नाही, याबाबत संबंधितांनी दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
सामान्यांसाठीही उपयुक्त
शासनाने काढलेल्या परिपत्रकात ही सूचना केवळ शासकीय कर्मचाऱ्यांसाठी असली तरी खासगी कार्यालयांमध्ये अनेक नागरिक त्यांच्या कार्यालयातही सॅनिटायझरची फवारणी संगणकाच्या मॉनिटरवर करतात. त्यामुळे सामान्य नागरिकांसाठीदेखील हा आदेश उपयुक्त ठरणारा आहे.