महिलांमुळे समाजव्यवस्था टिकून संजय दराडे : मालेगाव मॅरेथॉन स्पर्धेच्या बोधचिन्हाचे अनावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2018 12:11 AM2018-03-09T00:11:12+5:302018-03-09T00:11:12+5:30
मालेगाव : महिलांमुळेच देशातील समाजव्यवस्था टिकून आहे. महिला घर, कुटुंब योग्य पद्धतीने सांभाळीत असल्यामुळे पुरुष मंडळीला घराबाहेर पडता येते.
मालेगाव : महिलांमुळेच देशातील समाजव्यवस्था टिकून आहे. महिला घर, कुटुंब योग्य पद्धतीने सांभाळीत असल्यामुळे पुरुष मंडळीला घराबाहेर पडता येते. देश घडविण्यासाठी महिलांचा मोठा वाटा आहे, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस प्रमुख संजय दराडे यांनी केले.
महिला दिनाचे औचित्य साधून येत्या ११ मार्च रोजी नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस व मालेगाव शांतता समितीच्या संयुक्त विद्यमाने होणाºया मालेगाव मॅरेथॉन स्पर्धेच्या बोधचिन्ह व टी-शर्टच्या अनावरण कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर अपर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, तहसीलदार ज्योती देवरे, पोलीस उपअधीक्षक गजानन राजमाने, अजित हगवणे, डॉ. फातीमा, डॉ. समीना, प्रभारी वरिष्ठ अधिकारी एन. सूर्यवंशी उपस्थित होते. जिल्हा पोलीस प्रमुख दराडे पुढे म्हणाले की, महिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस दल सक्षम आहे. यासाठी दामिनी पथक तैनात करण्यात आले आहे. मालेगाव शहरातील नागरिकांचा उत्साह बघून रन फॉर युनिटी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदृढ व सुरक्षित मालेगाव शहरासाठी ११ मार्च रोजी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत शहरवासीयांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी तहसीलदार देवरे यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. हेमांगी वाव्हळ, डॉ. समीर पाटील, डॉ. अक्षय मेहता यांनी आरोग्याविषयी माहिती दिली. यापूर्वी वृद्ध धावपटू काशीनाथ कापडणीस, द्वारकादास तापडिया, डॉ. शशिकांत वाव्हळ, डॉ. दत्तात्रय पाटील यांच्यासह व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते मालेगाव मॅरेथॉन स्पर्धेच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. तसेच धावपटू अंजली गायकवाड, वैशाली शेलार व इतर महिला धावपटूंच्या हस्ते टी-शर्टचे प्रदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमात अमित कुलकर्णी यांनी शहरातील राष्टÑीय एकात्मतेवर बंधूभावचा संदेश देणारा व्हिडीओ प्रदर्शित करण्यात आला. तसेच नाशिक ग्रामीण पोलीस दलाने बनविलेल्या महिला सुरक्षिततेसाठीचा व्हिडीओ दाखविण्यात आला. १०९१ हा हेल्पलाइन क्रमांक जाहीर करण्यात आला. कार्यक्रमास नागरिक, महिला, पोलीस अधिकारी, कर्मचारी, शांतता समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन पिंकी मेहता यांनी केले. पोलीस उपअधीक्षक गजानन राजमाने यांनी आभार मानले.