ग्रामीण विकास यंत्रणेचे कर्मचारी करताहेत दबावाखाली काम संजय माळी अडचणीत : मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे कर्मचाऱ्यांची तक्रार
By Admin | Published: December 9, 2014 12:34 AM2014-12-09T00:34:23+5:302014-12-09T00:34:47+5:30
ग्रामीण विकास यंत्रणेचे कर्मचारी करताहेत दबावाखाली काम संजय माळी अडचणीत : मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे कर्मचाऱ्यांची तक्रार
नाशिक : जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालयातील तब्बल डझनभर कर्मचाऱ्यांनी सहायक प्रशासन अधिकारी (पशुसंवर्धन) डॉ. संजय माळी यांच्या विरोधात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली असून, त्यामुळे माळी अडचणीत येण्याची चिन्हे आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांच्याकडे कार्यालयीन अधीक्षक संजय कुमावत यांच्यासह सुमारे १४ कर्मचाऱ्यांच्या लेखी तक्रारीचे पत्र पाठविण्यात आले आहे. त्यात संजय माळी यांचे कार्यालयात कामकाज व सहकाऱ्यांशी वागणे अर्वाच्य भाषेचे असून, अनेक कर्मचारी मानसिक दडपणाखाली काम करीत आहेत. संजय कुमावत यांनी, तर या मानसिक दबावाखाली आपल्याला व्याधी जडल्याचा पुरावा एका खासगी डॉक्टरच्या औषधोपचाराचा कागदच या तक्रार अर्जाला जोडला आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रमुख अरविंद मोरे यांचा मध्यंतरीच्या काळात अपघात झाल्याने त्यांच्या मेंदूला गंभीर जखम झाली होती. त्यामुळे अपघातानंतर त्यांच्यावर कामकाजाचा फारसा बोजा न टाकण्याचे धोरण तेव्हाच्या व आताच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी स्वीकारले आहे. त्यातच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचा कारभार ठराविकच एक-दोन कर्मचारी चालवितात, असा सातत्याने आरोप मागील काळात करण्यात आला होता. त्यातील एका कर्मचाऱ्याची अन्यत्र बदली झाल्यानंतर तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित कुमार यांनी पुन्हा या कर्मचाऱ्याला त्याच जागेवर नियुक्ती दिली होती. आताही ठराविक कर्मचाऱ्यांमुळे त्रास होत असल्याची कर्मचाऱ्यांची ओरड आता थेट लेखी तक्रारीच्या स्वरूपात पुढे आली आहे.(प्रतिनिधी)