Sanjay Raut: गुलाबरावांचा जुलाबराव होईल, ५० खोकी पचणार नाहीत; संजय राऊतांची नाशिकमध्ये तुफान फटकेबाजी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2022 02:33 PM2022-07-09T14:33:13+5:302022-07-09T14:34:19+5:30
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांच्या बंडामुळे शिवसेनेला धक्का बसलेला असताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यासह प्रमुख नेते पक्ष बांधणीच्या कामाला लागले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांच्या बंडामुळे शिवसेनेला धक्का बसलेला असताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यासह प्रमुख नेते पक्ष बांधणीच्या कामाला लागले आहेत. शिवसैनिकांना बळ देण्यासाठी आणि पक्ष बांधणीसाठी खासदार संजय राऊतनाशिक दौऱ्यावर आहेत. नाशिकमध्ये संजय राऊत यांनी उपस्थित शिवसैनिकांनी संबोधित करताना शिंदे सरकारवर जोरदार टीका केली. यात बंडखोरी केलेल्या आमदारांपैकी संजय राऊत यांनी मुख्यत्वे आमदार गुलाबराव पाटील यांच्यावर निशाणा साधला. गुलाबरावांचा जुलाबराव होईल त्यांना देण्यात आलेले ५० खोके पचणार नाहीत, असा सणसणीत टोला संजय राऊत यांनी यावेळी लगावला.
आमदार फुटल्यामुळे शिवसेना फुटलेली नाही. शिवसेना जागेवरच आहे असा दावा करत संजय राऊत यांनी नाशिकमध्ये कार्यकर्त्यांना संबोधित केलं. यावेळी तुफान फटकेबाजी करत संजय राऊतांनी बंडखोरांचा शेलक्या शब्दात समाचार घेतला. "आमदारांकडून बंडखोरीबाबत विविध कारणं देण्यात येत आहेत. निधी मिळत नसल्याची कारणं हे सांगत असले तरी त्यांचं दुखणं वेगळच आहे. या गुलाबरावांचा लवकरच जुलाबराव होईल. यांना ५० खोकी पचणार नाहीत", असं संजय राऊत म्हणाले.
"शिवसेनेनं सर्वसामान्यांना संधी देऊन नेतृत्त्व उभं केलं. नगरसेवक, आमदार, खासदार बनवलं याचाच जर यांना विसर पडला असेल तर बाळासाहेब ठाकरे देखील यांना माफ करणार नाहीत. बंडखोर आमदारांनी आतापर्यंत घेतलेल्या निर्णयाबद्दल अनेक कारणं दिली आहेत. पण खरं कारण त्यांनी लपवलं आहे. त्यांना निधीची पूर्तता आणि ईडीच्या तावडीतून सूटका मिळाल्याने त्यांनी हे कृत्य केलं आहे", असं संजय राऊत म्हणाले.
शिवसैनिकांची हाय लागल्याशिवाय राहणार नाही
"बंडखोरांनी गद्दारी केलीय. पक्षप्रमुख चार महिने आजारी होते त्यामुळे कुणाला जास्त भेटू शकले नाहीत. याचाच फायदा घेऊन यांनी उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसला. सर्वसामान्य जनता मात्र उद्धव ठाकरेंच्या पाठिशी आहे. येथे जमलेले लोक ५० खोकी घेऊन नव्हे, तर स्वत:च्या खिशातले ५० रुपये खर्च करून उपस्थित आहेत. हीच खरी शिवसेना आहे. उद्धव ठाकरेंना ज्यादिवशी वर्षा बंगला सोडावा लागला त्यावेळी सर्वसामान्य शिवसैनिकाच्या डोळ्यांत अश्रू होते. या अश्रूंमध्ये बंडखोर वाहून जातील. बंडखोर आमदारांना शिवसैनिकांची हाय लागल्याशिवाय राहणार नाही", असंही संजय राऊत म्हणाले.
काही आमदार गेले म्हणजे शिवसेना फुटली असं होत नाही. शिवसैनिक जागेवरच आहे. अजूनही १०० आमदार आणि २५ खासदार निवडून आणण्याची ताकद शिवसेनेमध्ये आहे. ही ताकद शिवसेनेचीच आहे, असंही राऊत म्हणाले.
आम्ही रायगडाला सलाम करतो
आम्ही लाल किल्ल्याला सलाम नाही मारत आम्ही रायगडाला सलाम करतो. आमचे हायकमंड दिल्ली नाही मातोश्री आहे. दिल्लीवाल्याना मुंबई तोडायची आहे, म्हणून शिवसेना तोडली. यांना महाराष्ट्रचे तीन तुकडे करायचे आहेत, असा दावाही त्यांनी केला. तसेच धनुष्यबाण हा शिवसेनेचा आणि शिवसैनिकांचा पंचप्राण आहे. आमचे धनुष्यबाण कोणीही हिरावून देऊ शकत नाही, शिवसैनिक पेटले तर विझवणे मुश्किल होईल, हा महाराष्ट्र आदेशाची वाट पाहत आहे, असा इशाराही राऊत यांनी भाजपाला दिला.