Sanjay Raut: 'यात्रा नव्हे, ही तर येड्यांची जत्रा; मुख्यमंत्र्यांनी अतिशहाण्याला कायद्याचा लगाम घातला', संजय राऊतांचा पुन्हा राणेंवर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2021 11:59 AM2021-08-28T11:59:35+5:302021-08-28T12:00:02+5:30
Sanjay Raut: शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
Sanjay Raut: शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. राज्यात भाजपाच्या नवनिर्वाचित मंत्र्यांच्या यात्रा निघाल्या, पण त्यात एक अतिशहाणा निघाला. याची यात्रा नव्हे येड्यांची जत्रा सुरू आहे. त्यांनी मोदींचा आदेश पाळला नाही. अतिशहाणाल्याला कायद्याचा लगाम घालणं गरजेचं होतं आणि मुख्यमंत्र्यांनी तो लगाम घातला, असा जोरदार हल्ला संजय राऊत यांनी केला आहे. ते नाशिकमध्ये बोलत होते.
संजय राऊत आज पक्ष कार्यक्रमासाठी नाशिक दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्र्यांबाबत राणेंनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर नाशिकमध्ये शिवसैनिकांनी जोरदार आंदोलन केलं होतं. त्याचाही उल्लेख करत राऊतांनी नाशिकच्या शिवसैनिकांचं कौतुक केलं. जिथं पोहोचायचा होता तिथं नाशिकचा आवाज पोहोचला आहे. अख्ख्या देशात गेल्या ८ दिवसांपासून फक्त नाशिकची चर्चा सुरू होती. तुम्ही एफआयआर दाखल केलात तेव्हा मी भूवनेश्वरला होतो आणि तिथून परत आलो, असं संजय राऊत म्हणाले.
यात्रा नव्हे, येड्यांची जत्रा
"राज्यात भाजपच्या भारती पवार, कपिल पाटील, भागवत कराड यांनीही मोदींच्या आदेशानुसार जनआशीर्वाद यात्रा काढली. पण त्यांनी कुणीही शिवसेनेवर, उद्धव ठाकरेंवर किंवा महाविकास आघाडी सरकारवर टीका केली नाही. पण यात एकच अतिशहाणा निघाला. मुंबई विमानतळावर उतरल्यापासून त्यांनी खालच्या शब्दांत टीका सुरू केली होती. पण आपण नेहमी सभ्यता पाळत आलोय. बाळासाहेबांचे संस्कार आमच्यावर आहेत. उगाच कुणाला अंगावर आम्ही घेत नाही आणि कुणी अंगावर आलंच तर सोडणार नाही. यांची यात्रा ही यात्रा नव्हे, येड्यांची जत्रा होती", असं संजय राऊत म्हणाले.
"मोदींनी त्यांच्या नव्या मंत्र्यांना काय आदेश दिलेत ते मला जास्त माहित्येत. केंद्र सरकार करत असलेली कामं लोकांपर्यंत पोहोचवा आणि सरकारच्या कामांचा प्रचार आणि प्रसार करा, लोकांचं म्हणणं ऐकून घ्या, असं मोदींनी सांगितलं आहे. पण एक अतिशहाणा मोदींचाही आदेश पाळत नाही. केंद्र सरकारचा प्रचार करण्याऐवजी शिवसेना, उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि महाविकास आघाडीवर टीका करत सुटला आहे. ते जेव्हापासून मंत्री झालेत तेव्हापासून भाजप रोज १० फूट मागे जातोय आणि लवकरच भाजप फक्त अर्ध्याफूटावर येईल", असा टोला संजय राऊत यांनी यावेळी लगावला.