“आघाडीमध्ये पारदर्शकता होती म्हणून भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यात यश”: संजय राऊत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2021 01:56 PM2021-12-30T13:56:50+5:302021-12-30T13:57:37+5:30
सत्ता स्थापन करताना कोणत्याही प्रकारचा दगड आडवा येऊ नये, याची काळजी आम्ही स्वत: घेतली होती.
नाशिक: राष्ट्रवादी नेते आणि उपमख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पहाटेच्या शपथविधीवरून पुन्हा एकदा राजकारणात चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे. याचे कारण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी एका मराठी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत केलेले मोठे गौप्यस्फोट. यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले की, महाविकास आघाडीमध्ये पारदर्शकता होती. सर्वांना गोष्टी माहिती होत्या. म्हणूनच अजित पवारांसह अन्य आमदार परत आले आणि भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यात यश आले.
संजय राऊत नाशिक दौऱ्यावर आले होते. ज्या वेळी महाराष्ट्रात भाजपला सत्ता स्थापन करायची होती त्यावेळी सत्तेच्या नशेमुळे भाजप कोणाबरोबरही जाऊन सत्ता स्थापन करण्यास तयार होती. मग त्यांनी शरद पवारांना ही ऑफर दिली होती. हे आम्हाला सर्वांना माहिती होते. एवढेच नाही तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे फडणवीस यांच्याबरोबर सत्ता स्थापन करणार आहेत. एवढेच स्पष्ट पारदर्शकता महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये होती. कारण आम्हाला सत्ता स्थापन करायची होती आणि सत्ता स्थापन करताना कोणत्याही प्रकारचा दगड आडवा येऊ नये, याची काळजी आम्ही स्वतः घेतली होती, असा दावा संजय राऊत यांनी केला.
शरद पवार सांगत आहेत, त्याअर्थी ते खरे असायला हवे
ज्याअर्थी शरद पवार हे सांगत आहेत, त्याअर्थी ते खरे असायला हवे. कारण त्यावेळी भाजपा सरकार स्थापन करण्यासाठी इतकी उत्तेजित झाली होती की, काहीही करुन त्यांना महाराष्ट्रात सत्ता स्थापन करायची होती. मग याच्याशी बोला, त्याच्याशी बोला, याला फोडा, अजित पवारांना गाठा, आमच्या लोकांना गाठा असा मोठा उपक्रम सुरु होता. आम्ही एकमेकांपासून कोणतीही गोष्ट लपवत नव्हतो. आमच्याकडे गुप्त काही नव्हते. कोण काय बोलते, कुणाला भेटते याबाबत पारदर्शकता होती. याबाबत भाजपाला माहिती नव्हते. त्या पारदर्शकतेमुळे त्यांचे सरकार येऊ शकले नाही. अजित पवार शपथ घेण्यासाठी गेले त्यातही पारदर्शकता होती. म्हणूनच अजित पवारांसोबत सगळे आमदार परत आले, असे संजय राऊत म्हणाले.