Sanjay Raut: शिवसैनिक उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्री करणार; मालेगावातून संजय राऊत कडाडले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2023 07:52 PM2023-03-26T19:52:31+5:302023-03-26T20:10:53+5:30
'निवडणूक आयोगाच्या बापाला विचारुन बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापन केली नाही.'
मालेगाव- आज राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची नाशिकच्या मालेगावमध्ये जाहीर सभा होत आहे. यावेळी उद्धव ठाकरेंच्या भाषणापूर्वी शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाषण केले. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. यावेली त्यांनी पुन्हा एकदा गद्दार आणि खोक्यांचा उल्लेख केला.
यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की, 'मालेगावात आज तुफा आलंय आणि या तुफानाला कोणी रोखू शकत नाही. शिवसेना काय आहे पाहायचं असेल, तर त्या निवडणूक आयोगाने इकडं येऊन पाहावं. निवडणूक आयोगाच्या बापाला विचारुन बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापन केली नाही. बाळासाहेब ठाकरेंसारखा अद्भूत व्यक्ती जन्माला आला आणि त्याने शिवसेना नावाचं महाकाव्य निर्माण केलं. समोर जे बसलेले आहेत, ते प्रामाणिक आणि निष्ठावंत शिवसैनिक आहेत. ही शिवसेना पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या विधानसभेवर भगवा फडकवेल आणि उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करेल,' असं ते म्हणाले.
संजय राऊत पुढे म्हणतात, 'बातम्या येत होत्या की, मालेगावात उद्धव ठाकरेंची तोफ धडकणार. पण, मालेगावचा ढेकून चिरडायला तोफेची गरज नाही. शिवसेना तुटलेली नाही, वाकलेली नाही. सगळ्या जाती धर्माचे लोक शिवसेनेच्या पाठिशी उभे आहेत. आपल्यासारखा प्रामाणिक नेता आम्हाला मिळाला. तुमच्या प्रमाणिकपणावर विश्वास ठेवून महाराष्ट्र तुमच्या पाठिशी उभा आहे. चिते की चाल, बांज की नजर, बाजीराव कि तलवार और उद्धव ठाकरे की प्रामाणिकता पर संदेह नकी किया जाता,' असंही राऊत यावेळी म्हणाले.