Sanjay Raut: राज्यातील सध्याचे सरकार बेकायदेशीर; शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2022 01:10 PM2022-07-08T13:10:54+5:302022-07-08T13:11:18+5:30
Sanjay Raut: राज्यातील फुटीर आमदारांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल आहे अशा स्थितीत राज्यात नव्याने स्थापन झालेले सरकार बेकायदेशीर आहे असा दावा शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी केला.
नाशिक- राज्यातील फुटीर आमदारांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल आहे अशा स्थितीत राज्यात नव्याने स्थापन झालेले सरकार बेकायदेशीर आहे असा दावा शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी आज नाशिकमध्ये केला खासदार राऊत हे नाशिकच्या तीन दिवसीय दौऱ्यावर असून काल रात्री त्यांचे आगमन झालं. आज सकाळी ते पत्रकार परिषदेत बोलत होते. भाजपा हा पक्ष शिवसेनेशी समोरून लढू शकत नाही त्यामुळे शिवसेनेचे आमदार फोडून हेच शिवसेनेच्याच विरोधात लढाईचे षडयंत्र रचत असल्याचा आरोप खासदार राऊत यांनी यावेळी केला.
भाजपा विषयी आता आपण बोलत नाहीत कारण त्यांना शिवसेनेच्या विरोधात बोलण्यासाठी नवीन 40 भोंगे फाटाफुटीतून मिळाले आहेत असेही राऊत म्हणाले. नाशिक महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या तयारीसाठी आपण नाशिकमध्ये आलो असून नाशिकचे शिवसेनेचे सदैव शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी होते आणि त्यांच्या पाठीशीच राहतील असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला.
मुंबई वेगळी करण्याचे आणि तोडण्याचे भाजपाचे स्वप्न शिवसेना असेपर्यंत पूर्ण होणार नाही त्यामुळे भाजपकडून जाणीवपूर्वक शिवसेनेला संपवण्याचा कट केला जात आहे असा आरोपही संजय राऊत यांनी केला.